बागलकोट, बिदरसह राज्यभरात 40 हून अधिक ठिकाणी छापे : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्त विभागाने पुन्हा दणका दिला असून मंगळवारी पहाटे राज्यातील 40 हून अधिक ठिकाणी झडती घेण्यात आली. 12 अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी तडकाफडकी छापे टाकले. या कारवाईत अनेकांजवळ मोठ्या प्रमाणावर घबाड आढळले आहे. बेहिशेबी मालमत्ता संपादनाच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
बागलकोट, बिदर, हावेरी, कलबुर्गी, चित्रदुर्ग, शिमोगा, दावणगेरे, आणि बेंगळूर शहर जिल्ह्यांत लोकायुक्त पथकाने अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालये व त्यांच्या नातलगांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या आहेत. बेहिशेबी मालमत्ता संपादन प्रकरणी अलमट्टी उजव्या कालव्याचे साहाय्यक मुख्य अभियंते चेतन माळजी यांचे बागलकोट शहरातील नवनगर येथील निवासस्थान आणि कमतगी येथील कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. यावेळी महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन पडताळणी करण्यात आली. लोकायुक्त अधीक्षक मल्लेश यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

माध्यमिक परीक्षा मंडळाच्या संचालकांनाही दणका
बेंगळूरमध्ये कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालक व्ही. सुमंगला, बीएमआरसीएलचे विशेष भूसंपादन कार्यालयातील सर्वेक्षक एन. के. गंगमारी गौडा आणि मल्लसंद्र प्रसूती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी मंजुनाथ जी. यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली.
बिदरमधील कृषी खात्याच्या अधिकाऱ्याची निवासस्थानी झडती
बिदर तालुक्यातील कृषी खात्याचे साहाय्यक संचालक धुळाप्पा यांच्या बिदरमधील निवासस्थानासह 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले. लोकायुक्त अधीक्षक सिद्धराजू आणि डीवायएसपी हनुमंत रे•ाr यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. भालकी तालुक्यातील कड्याळ येथील निवासस्थान, औराद येथील कार्यालयातही झडती घेण्यात आली. तपासणीसाठी तेथील कागदपत्रे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली.
चित्रदुर्ग येथे होळल्केरेचे कृषी साहाय्यक संचालक चंद्रकुमार यांच्या तरळबाळू येथील निवासस्थान, होळल्केरे तालुक्यातील टी. नुलेनूर येथील निवासस्थाने आणि कार्यालवर धाडी टाकण्यात आल्या. चंद्रकुमार यांच्या निवासस्थानी लाखोंची रोकड, सोन्याची दागिने व इतर एशोआरामी वस्तू आढळून आल्या. लोकायुक्त अधीक्षक वासुदेवराम व डीवायएसपी मृत्युंजय यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
दावणगेरेत दोन अधिकाऱ्यांनी घबाड
दावणगेरे येथे केआरआयडीएलचे साहाय्यक अभियंते जगदीश नायक आणि अन्न-नागरी पुरवठा खात्याचे द्वितीय श्रेणी साहाय्यक बी. एस. नडुवीनमनी यांची निवासस्थाने, कार्यालये व इतर ठिकाणी छापे टाकण्यात आले. दोन्ही अधिकाऱ्यांशी संबंधित 10 मालमत्तांची झडती घेण्यात आल्याचे समजते. दावणगेरेचे लोकायुक्त अधीक्षक एम. एस. कौलापुरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. दोन्ही अधिकाऱ्यांजवळ कोट्यावधी रुपये किमतीचे दागिने, भूखंड, शेतजमीन, महागडी वाहने आढळली आहेत.
आरोग्य खात्याच्या प्रथम श्रेणी साहाय्यक ज्योती मेरी यांचे हासनच्या सत्यमंगल कॉलनीतील निवासस्थान, कुवेंपूनगरमधील त्यांच्या बहिणीच्या निवासस्थानावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. लोकायुक्त अधीक्षक स्नेहा, डीवायएसपी सुरेश व इतर अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत ज्योती यांच्याशी संबंधित मालमत्तांचा तपशिल जमा करण्यात येत होता.
राणेबेन्नूरमध्ये दोन अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी तपासणी
हावेरी जिल्ह्यातील सवनूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी बसवराज शिडेनूर आणि राणेबेन्नूरचे महसूल निरीक्षक अशोक अरळेश्वर यांनाही लोकायुक्त विभागाने दणका दिला. बसवराज यांचे राणेबन्नूर शहरातील चेळमुर्डेश्वरनगर येथील निवासस्थान तसेच अशोक यांच्या सिद्धेश्वरनगर निवासस्थानाला लोकायुक्त पथकाने लक्ष्य बनविले. या दोघांजवळ मोठ्या प्रमाणावर सोन्याची दागिने, रोकड, भूखंड आढळल्याचे समजते.









