बदलीसाठी लाच : दोघांना रंगेहाथ पकडले
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पंधरा हजार रुपये लाच स्वीकारताना महिला व बालकल्याण खात्यातील कार्यालयीन अधीक्षकासह दोघा जणांना गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहे. या दोघा जणांना अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भरत रेड्डी, पोलीस निरीक्षक वेंकटेश यडहळ्ळी, रवी धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात ही कारवाई केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतलेले पंधरा हजार रुपये अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
महिला व बालकल्याण खात्यातील कॉम्प्युटर ऑपरेटर सौम्या ऊर्फ शशिकला बडीगेर (वय 38) व ऑफिस सुपरिंटेंडेंट आर. ए. व्हन्नूरवली (वय 39) यांना अटक झाली आहे. कणगला, ता. हुक्केरी येथील शकुंतला मारुती कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी या दोघा जणांनी शकुंतला यांच्याकडून पंधरा हजार रुपये मागितले होते. शकुंतला कांबळे या अंगणवाडी साहाय्यिका आहेत. बदलीसाठी त्यांच्याकडे 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. शेवटी पंधरा हजार रुपयांना व्यवहार ठरला होता. गुरुवारी सकाळी शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याच्या कार्यालयात रक्कम घेताना छापा टाकून या दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले. दोघा जणांवरील कारवाईमुळे सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.









