हजेरी पुस्तकासह विविध फाईलींची तपासणी : अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती
बेळगाव : या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बेळगाव तहसीलदार कार्यालयात सोमवारी दुपारी अचानक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासह कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केल्याने तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. सायंकाळी उशिरापर्यंत कार्यालयाची झाडाझडती लोकायुक्त अधिकाऱ्यांकडून सुरूच होती. सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी लोकायुक्ताकडून सातत्याने कारवाई सत्र सुरू आहे. कामे करून देण्यास पैशांची मागणी करणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले जात आहे. त्याचबरोबर उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक माया जमविलेल्या अधिकाऱ्यांवरदेखील लोकायुक्तांकडून सातत्याने छापेमारी करून कारवाई केली जात आहे. त्यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लोकायुक्तांकडून राज्यासह जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांना अचानक भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्याप्रमाणे सोमवारी दुपारी लोकायुक्तचे पोलीस उपअधीक्षक डी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन लोकायुक्त पोलीस निरीक्षक व त्यांचे सहकारी अचानक तहसीलदार कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी कार्यालयात द्वितीय दर्जा तहसीलदार सुभाष असोदे होते. लोकायुक्त अधिकाऱ्यांचे पथक अचानक तहसीलदार कार्यालयात दाखल झाल्याने तहसीलदारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
अधिकाऱ्यांनी विविध कक्षांना भेट देऊन त्या ठिकाणी प्रलंबित असलेल्या फाईलींची विचारपूस केली. चौकशी करण्यासह किती दिवसांपासून फाईल प्रलंबित आहेत व त्यांना कारण काय? याबाबत विचारणा केली. विनाकारण लोकांची कामे करून देण्यास विलंब लावू नये, अन्यथा संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारादेखील देण्यात आला. इतकेच नव्हे तर तहसीलदार कार्यालयातील हजेरी पुस्तकाचीही पाहणी केली. अधिकारी व कर्मचारी सकाळी किती वाजता येतात व सायंकाळी किती वाजता बाहेर जातात. याबाबतही माहिती जाणून घेण्यात आली. दुपारी दाखल झालेले अधिकारी सायंकाळी उशिरापर्यंत तहसीलदार कार्यालयातच होते.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना कानमंत्र
पोलिसांची दोन वाहने कार्यालयाबाहेर थांबून होती. त्याचबरोबर अधिकाऱ्यांची चौकशी केली जात होती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा पडल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. मात्र सोमवारची कारवाई नियमित स्वरुपाची असल्याचे सांगण्यात आले. लोकायुक्तांनी तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कानमंत्र दिल्याने यापुढे तरी कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा होणार की नाही? हे पहावे लागणार आहे.









