प्रतिनिधी / बेळगाव, बेंगळूर
बेहिशेबी मालमत्ता संपादनप्रकरणी लोकायुक्त विभागाने भ्रष्ट अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. धारवाड, बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, रामनगर, तुमकूर, दावणगेरे, चिक्कबळ्ळापूर, बिदर आणि कोप्पळ या 9 जिल्ह्यांमध्ये 14 अधिकाऱ्यांवर 48 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी एकाच वेळी छापे टाकले. बेळगाव महानगरपालिकेचे साहाय्यक आयुक्त संतोष आनिशेट्टर यांच्या धारवाड व बेळगाव येथील निवासस्थानांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी छापे टाकले आहेत. या कारवाईत नेमके कितीचे घबाड उघडकीस आले? याविषयी रात्रीपर्यंत अधिकृत माहिती हाती आली नाही.
सप्तापूर-धारवाड येथील संतोष आनिशेट्टर यांचे घर, सुभाषनगर बेळगाव येथील फ्लॅटवर छापे टाकण्यात आले. लोकायुक्त पोलीस निरीक्षक उस्मान आवटी यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने बेळगाव येथे छापा टाकून कागदपत्रांची पडताळणी केली. या छाप्यात काही मालमत्तांविषयीची कागदपत्रे, परदेशी बेल्ट, किमती मद्य आढळून आले आहे. सुभाषनगर येथील फ्लॅटची तपासणी केल्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मनपा कार्यालयातही तपासणी केली. दरम्यान, लोकायुक्त विभागाचे पोलीसप्रमुख सतीश चिटगुब्बी यांच्या नेतृत्त्वाखाली धारवाड येथील निवासस्थानावरही तपासणी करण्यात येत आहे. एकूण पंधराहून अधिक अधिकाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला आहे.
लाच प्रकरणातील अधिकारी लक्ष्य
त्याचप्रमाणे बेंगळूर ग्रामीण जिल्ह्यातील देवनहळ्ळीचे ग्रेड-2 तहसीलदार शिवराज, चिक्कजाल ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मीपती यांच्यासह चौघांच्या मालमत्तांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. तुमकूर जनस्पंदन कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनहळ्ळी नागराज, अलीकडेच लाच प्रकरणी रंगेहाथ सापडलेले बेंगळूर महापालिकेचे महसूल निरीक्षक नटराज यांच्या निवासस्थानांवर छापे टाकून झडती घेण्यात आली आहे. त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. या चौघांशी संबंधित 23 ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

बेंगळूरच्या महादेवपूर विभागाचे महसूल निरीक्षक नटराज यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे लोकायुक्त पथकाने त्यांच्या शिवनगळ्ळी येथील बंगला, 7.5 एकर नारळ बागायत, सुपारी बागायतीवर धाडी टाकल्या. 4 ऑगस्ट रोजी 5 लाखांची लाच घेताना नटराज यांना अटक करण्यात आली होती. आता त्यांच्यावर लोकायुक्त विभागाने कारवाई केली आहे.
बिदरमध्येही छापे
बिदर जिल्ह्यात चिटगुप्पा पोलीस स्थानकाचे कॉन्स्टेबल विजयकुमार यांच्या दोन निवासस्थानांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने धाडी टाकून तपासणी केली. बिदर तालुक्यातील होसकनहळ्ळी आणि हुमनाबाद शहरातील टीचर्स कॉलनीतील बंगल्यावर छापा टाकण्यात आला.
तुमकूर नगरविकास प्राधिकरणाचे संचालक नागराजू यांचे निवासस्थान व कार्यालयावर धाड लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील चिक्कजाल ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मीपती यांचे फार्महाऊस आणि निवासस्थानी धाड टाकून तपासणी करण्यात आली. कोडगू जिल्ह्यातही अतिरिक्त जिल्हाधिकारी नंजुंडेगौडा आणि हारंगी जलाशयाचे अधीक्षक अभियंता रघुपती यांनाही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दणका दिला. नंजुंडेगौडा यांचे कोडगूमधील निवासस्थान, कार्यालय, म्हैसूरमधील नातेवाईकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. त्याचप्रमाणे हारंगी जलाशयाची अधीक्षक अभियंता रघुपती यांच्या म्हैसूरमधील बंगल्यावर गुरुवारी पहाटे छापा टाकण्यात आला.
चित्रदुर्गमध्ये 15 लाख रु. जप्त
चित्रदुर्ग जिल्ह्यातील होळल्केरे येथील लघुपाटबंधारे खात्याचे अभियंता के. महेश आणि त्यांची पत्नी बेंगळूर महानगरपालिकेच्या अधिकारी भारती यांनाही लोकायुक्त विभागाने दणका दिला आहे. त्यांच्याजवळील रोख 15 लाख रुपये आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. कोप्पळमधील निर्मिती केंद्राचे व्यवस्थापक मंजुनाथ बन्नीकोप्प यांच्यावरही रायचूरमधील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला.









