रामतीर्थनगर, सदाशिवनगर येथील दोन अधिकाऱ्यांवर कारवाई : मोठे घबाड उघडकीस
बेळगाव : उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांनी सोमवारी सकाळी छापे टाकले. बेळगाव येथील दोघा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर कारवाई करण्यात आली असून या कारवाईत मोठ्या प्रमाणात घबाड उघडकीस आल्याची माहिती मिळाली आहे. लोकायुक्त पोलीस प्रमुख हनुमंतराय यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक जे. रघू, बी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, आदींचा समावेश असलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी रामतीर्थनगर व सदाशिवनगर येथील दोन अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती.
गुलबर्गा येथील शहर व ग्रामीण विकास नियोजन विभागाचे अधिकारी आप्पासाब कांबळे यांच्या रामतीर्थनगर बेळगाव येथील निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. याचबरोबर गुलबर्गा येथे सध्या ते राहत असलेल्या घरावरही छापा टाकण्यात आला. ऑटोनगर येथील एका कारखान्यातही तपासणी करण्यात आली असून या कारवाईत नेमका कितीचा घबाड हाती आला याचा तपशील उपलब्ध झाला नाही. पंचायतराज विभागाचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी महादेव बिरादार-पाटील यांच्या सदाशिवनगर-संपिगे रोड येथील निवासस्थान, खानापूर येथील घर व कित्तूर येथील भावाच्या घरावर एकाचवेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या कारवाईत दोन कोटी 39 लाखाहून अधिक घबाड उघडकीस आल्याची माहिती मिळाली असून रात्री उशिरापर्यंत तपासणी व चौकशी सुरू होती.









