बिदरमधील पशुवैद्यकीय विद्यापीठात भ्रष्टाचार : बिदर, बेंगळूरसह विविध जिल्ह्यांत कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
बिदर शहरातील पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी लोकायुक्त विभागाने राज्यभरात तब्बल 69 ठिकाणी छापे टाकले. विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत बिदरमधील लोकायुक्त कार्यालयात बेंगळूर येथील वेंकट रे•ाr यांनी तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले.
2021 मध्ये बिदरमधील पशुवैद्यकीय आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठात काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांत लोकायुक्त पथकांनी झडती घेतली. भ्रष्टाचारसंबंधी कागदपत्रे व तपशिल गोळा करण्यात आल्याचे समजते.
बिदर जिल्ह्यातील 24, बेंगळूरमध्ये 31 ठिकाणी, कोप्पळमध्ये 2 ठिकाणी, चिक्कमंगळूर जिल्ह्यातील तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. हासन, रामनगर, कोलार आणि उडुपी जिल्ह्यांसह एकूण 69 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
विद्यापीठात 35 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप तक्रारदाराने 4 ऑक्टोबर 2021 रोजी केला होता. या संदर्भात लोकायुक्त विभागाने केलेल्या चौकशीवेळी 22 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले होते. विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एन्टरप्रायझेसशी सामील होऊन साहित्योपकरणे, स्टेशनरी खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
बुधवारी लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या पथकाने विद्यापीठाचे नियंत्रक सुरेश यांचे बंधू मल्लिकार्जुन यांच्या चिक्कमंगळुरातील निवासस्थानी झडती घेतली. चिक्कमंगळूरच्या कल्याणनगर येथील निवासस्थानावर लोकायुक्त डीवायएसपी तिरुमलेश यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. सुरेश यांनी 2021 मध्ये बिदरमधील पशुवैद्यकीय आणि मस्त्य विज्ञान विद्यापीठात नियंत्रक म्हणून सेवा बजावली होती.









