बेळगाव-अथणी येथे कारवाई : अथणी पूरग्रस्त मदत निधीत घोटाळ्याचा आरोप
बेळगाव : मूळचे बेळगावचे व सध्या विजयनगर जिल्ह्यात वीजमंडळात कार्यकारी अभियंतेपदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या बेळगाव येथील घरावर बुधवारी सकाळी लोकायुक्तांनी धाड टाकली. केवळ बेळगावच नव्हे तर संकोनट्टी, ता. अथणी येथील निवासस्थान, हगरी बोम्मनहळ्ळी येथील कार्यालयावरही धाडी टाकण्यात आल्या. रामतीर्थनगर येथील शेखर बहुरुपी या वीजमंडळाच्या कार्यकारी अभियंत्याच्या घरात तपासणी करण्यात आली. या परिसरात तीन मजली इमारत उभी करण्यात आली आहे. लोकायुक्त विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळपासून तपासणीची मोहीम राबविली.vया कारवाईत नेमके कितीचे घबाड उघडकीस आले, याविषयीची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही. कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. लोकायुक्त विभागाच्या प्रभारी पोलीस अधीक्षक अनिता हद्दण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अथणी येथे कार्यरत असताना पूरग्रस्तांना भरपाई देताना मोठा घोटाळा झाला होता. या प्रकरणातही शेखर बहुरुपी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता त्यांचे घर व कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या असून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.









