बळ्ळारीतील बाळंतिणींच्या मृत्यूनंतर बेळगावातही कारवाई, मुदत संपलेल्या औषधांचा साठाही आढळला
प्रतिनिधी/ बेळगाव
बळ्ळारी येथील जिल्हा इस्पितळात चार बाळंतिणींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला ग्लुकोज कारणीभूत असल्याचा संशय बळावल्यामुळे शनिवारी बेळगाव येथील सरकारी औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात दोन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या औषधांचा साठाही सरकारी गोदामात आढळून आला आहे.
बळ्ळारी येथील सरकारी इस्पितळात एकापाठोपाठ एक चार बाळंतिणींचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. स्वत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय, उपअधीक्षक बी. एस. पाटील, निरीक्षक निरंजन पाटील आदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने सरकारी औषध गोदामावर छापा टाकला.
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात हे गोदाम आहे. या गोदामातील औषध साठ्याची तपासणी हाती घेण्यात आली आहे. या गोदामातून बेळगावसह पाच तालुक्यातील सरकारी इस्पितळांना औषध पुरवठा केला जातो. बळ्ळारी येथील बाळंतिणींच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सलाईनच्या बाटल्या (ग्लुकोज) या गोदामातही आढळून आल्या आहेत.
बाळंतिणींच्या मृत्यूला रिंगर लॅक्वेट सोल्युशन कारणीभूत असू शकते, या संशयाने बळ्ळारी जिल्हा इस्पितळातील रुग्णांना ग्लुकोज देणे बंद करण्यात आले आहे. याच कंपनीचे ग्लुकोज बेळगावच्या गोदामातही मोठ्या प्रमाणात आहे. आठहून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाने हा औषध साठा पुरवठा बंद करण्याची सूचना केली आहे.
कोलकाता येथील एका कंपनीकडून पुरविल्या गेलेल्या ग्लुकोजच्या बाटल्या इस्पितळांना वितरित करू नये, अशी सूचना देतानाच लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव गोदामातून सॅम्पल घेतले असून तपासणीसाठी ते प्रयोगशाळेला पाठवण्यात येणार आहे. यासंबंधी लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही औषधांचे सॅम्पल घेतली आहेत. तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन वर्षांपूर्वीच मुदत संपली
कोरोनाच्या काळात रेमिडिसिवर या लसीसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अग्निदिव्य पार करावे लागत होते. या लसींचे दोन बॉक्स सरकारी औषध गोदामात आढळून आले असून दोन वर्षापूर्वीच त्याची मुदत संपली आहे. मुदत संपली तरी गोदामात ते कशासाठी ठेवण्यात आले, दोन वर्षात ते नष्ट का करण्यात आले नाही? असा प्रश्न लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाची परवानगी घेऊन हा औषध साठा नष्ट करायचा असतो. परवानगीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता हा साठा आम्ही नष्ट करणार होतो, अशी माहिती औषध गोदामातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकायुक्तांना दिली आहे.









