पालकमंत्री जारकीहोळी यांची माहिती : रिंगरोडचे काम लवकरच
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरामध्ये बुडा, महानगरपालिका तसेच स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या गैर कारभारांची लोकायुक्तांकडे खासगी तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौकशीसाठी बेंगळूरहून अधिकारी येणार आहेत. याची गुप्तपणे चौकशी करण्यात येत आहे. गैरकारभारात सहभागी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
रिंगरोडच्या कामाला लवकरच प्रारंभ
राज्यातील 28 महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा वाढविण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या बाबत बैठक घेणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव, हालगा, मच्छे बायपास रस्त्याच्या कामाला विलंब होण्यास कंत्राटदार कारणीभूत आहेत. कंत्राटदार काम सोडून गेला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकाराकडून त्याच कंत्रटदाराला काम देण्याची सूचना केली आहे. रिंगरोडचे काम लवकरच प्रारंभ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त जिल्ह्याची लवकरच घोषणा
राज्यामध्ये पावसाची कमतरता आहे. पाऊस कमी झालेल्या जिल्ह्याची माहिती घेण्यात आली आहे. सदर जिल्हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. जुलै 15 पर्यंत पावसाचे प्रमाण पाहून यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुपरस्पेशालिटी रुग्णालये लवकरच प्रारंभ
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात 162 कोटी रुपये खर्च करून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. नुकताच जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रुग्णालयाला अनुदान राखीव ठेवण्यात आले आहे. लवकरच कर्मचाऱ्यांची नेमणूक करून रुग्णालये सुरू करण्यात येईल.
खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था
खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेत बस नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घेण्यात आली असून सरकारकडून चार हजार बस खरेदी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. नवीन बस उपलब्ध झाले असल्यास खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना सोय करून देण्यात येईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
लोकसभेसाठी दोन महिन्यांत उमेदवारांची नावे जाहीर करू
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून सांगितल्यास निवडणूक लढविणार. निवडणुकीसंदर्भात बेंगळूर येथे बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील आमदारांबरोबर चर्चा करण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत बेळगाव, चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. दोन्ही मतदारसंघात इच्छुक असणाऱ्यांची यादी मोठी आहे. स्थानिक आमदार, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री सतिश जारकीहोळी यांनी सांगितले.









