लोकायुक्तांच्या कारवाईमुळे भ्रष्ट सरकारी बाबूंचे धाबे दणाणले
बेळगाव : संकेश्वर येथील युनायटेड सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लबची नोंदणी करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयातील अधीक्षक मंगळवारी लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. भरतेश शेबन्नवर असे त्यांचे नाव असून या कारवाईमुळे सहकार खात्यातील भ्रष्ट सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत. प्रशांत तमराम कळगडे (रा. संकेश्वर) यांनी युनायटेड सोशल अॅण्ड स्पोर्ट्स क्लब या नावाने संघाची नोंदणी करण्यासाठी सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. मात्र सदर नोंदणी करून देण्यासाठी कार्यालयातील अधीक्षक भरतेश शेबन्नवर याने गेल्या 20 दिवसांपासून चालढकल चालविली होती. त्यामुळे संघाची नोंदणी करून देण्यात यावी अशी मागणी कलगडे यांनी सातत्याने केल्याने भरतेशने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यामुळे श्रीकांत कळगडे यांनी सोमवार दि. 24 रोजी याप्रकरणी लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार लोकायुक्त जिल्हा पोलीसप्रमुख हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकायुक्त पोलीस उपअधीक्षक बी. एस. पाटील, लोकायुक्त पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, रवीकुमार धर्मट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधीक्षक भरतेश शेबन्नवर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. विविध संघ-संस्थांची नोंदणी करण्यासाठी सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. मात्र प्रत्यक्षात तक्रार करण्यास पुढे येणाऱ्यांची संख्या कमी आहे. सरकारी कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत लोकायुक्तांकडे तक्रार करावी, असे आवाहन लोकायुक्त पोलिसांनी केले आहे. मंगळवारी सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मात्र भ्रष्ट सरकारी बाबूंचे धाबे दणाणले आहेत.









