खेड :
‘तू दारुचा धंदा करतोस, आताच्या आता दोन लाख रुपये दे अन् दरमहा दहा हजार रुपये दे’ असे धमकावत 60 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल्ला हुसैन नाडकर (56, रा. संगलट–खेड) याला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणात अजून तिघांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना 14 सप्टेंबर 2024 रोजी घडली होती.
याबाबत प्रकाश महादेव महाडिक (रा. संगलट, खेड) यांनी 13 मार्च रोजी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित हा इनोव्हा कारमधून (एमएच 04 एफआर 1999) फिर्यादीच्या घरी गेला होता. आपण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा मोठा साहेब असल्याची बतावणी करत त्याने संशयिताने 2 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र एवढी रक्कम नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यावर त्याने 1 लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत त्याने शहरातील महाडनाका येथील कार्यालयात 60 हजार रुपये घेवून ये, असे दरडावत कोणाला सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी फिर्यादीस दिली.
या धमकीनंतर घाबरलेल्या फिर्यादीने चुलत भाऊ दिलीप सखाराम महाडिक यांच्याकडून 20 हजार रुपये व विश्वनाथ देवजी महाडिक यांच्याकडून 15 हजार रुपये उसने घेत स्वत:कडील 25 हजार रुपये असे 60 हजार रुपये गोळा करून ठेवले होते. 14 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संशयिताने महाडनाका येथील कार्यालयात रक्कम घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार कार्यालयात जाण्यासाठी रस्त्यावर उभा असताना 60 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत कोणाला सांगायचे नाही, असे धमकावले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाल्यानंतर अब्दुल्ला नाडकरसह अन्य तिघेजण रातोरात पसार झाले होते.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली तीन पथकांकडून चौघांचा कसून शोध सुरू होता. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अब्दुल्ला नाडकर पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर कसून चौकशी करण्यात आली असता अन्य तिघांची नावे सांगण्यास त्याने असमर्थता दर्शवली. रात्री नाडकर याला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.








