बसप कुणासोबत आघाडी करणार नाही
वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्ष चालू वर्षी 5 राज्यांमध्ये होणारी विधानसभा निवडणूक आणि 2024 ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा मायावती यांनी बुधवारी केली आहे. विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’च्या मुंबई येथील बैठकीच्या पूर्वदिनी मायावतींनी केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मायावती यांच्याशी संपर्क केला होता.
रालोआ किंवा इंडिया आघाडीत प्रामुख्याने गरीबविरोधी, जातीयवादी, सांप्रदायिक, भांडवलदार समर्थक पक्ष आहेत. अशा पक्षांच्या धोरणांच्या विरोधात बसप संघर्ष करत आहे. याचमुळे अशा पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मायवती यांनी म्हटले आहे.
बसप विरोधी पक्षांच्या जोड-तोडच्या राजकारणापेक्षा समाजातील उपेक्षितांना परस्पर बंधूभावाच्या आधारावर जोडून त्यांच्यामदतीने 2007 प्रमाणे स्वबळावर आगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक लढविणार आहे. प्रसारमाध्यमांनी बसपविषयी वारंवार गोंधळाची स्थिती निर्माण करू नये असे मायावती यांनी म्हटले आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी देखील मायावती यांनी एक पत्रक जारी करत आघाडी करणार नसल्याची घोषणा केली होती.
बसपसोबत आघाडी करण्यास अनेक पक्ष आतुर आहेत, परंतु असे न केल्यास विरोधी पक्ष बसपवर भाजपसोबत संगनमत केल्याचा आरोप करतात. विरोधी पक्षांच्या आघाडीत सामील झाल्यास बसप धर्मनिरपेक्षवादी, अन्यथा भाजपसमर्थक असा आरोप केला जातो असा दावा मायावती यांनी केला आहे.









