राज्यातील सत्तेत रुळत जातील तशा मित्र पक्षांच्या मागण्या वाढतच चाललेल्या आहेत. भाजपने आतापर्यंत छातीवर दगड ठेवला पण आता प्रश्न लोकसभा निवडणुकीचा आहे. आता शिंदेसेनेला 22 आणि अजितदादा गटाला मागितल्या तितक्या जागा द्यायच्या ठरल्या तर ज्यासाठी दोन पक्ष फोडले ते लोकसभेचे उद्दिष्ट साध्य कसे होणार? त्यामुळे आता छातीवर की हातात दगड घेणार हा खरा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लोकसभेच्या 22 मतदारसंघातील आपल्या पक्षाच्या ताकदीची आणि तयारीची चाचपणी केली. त्यात त्यांना काय आढळले हे फार महत्वाचे नाही. या चाचपणीमुळे अजितदादा गटाच्या पोटात कालवाकालव व्हावी हा मूळ उद्देश दिसत होता. मात्र, दादांपेक्षाही अस्वस्थता दिसत आहे ती भाजपमध्ये! तसेही दादांकडे राष्ट्रवादीच्या चारपैकी केवळ एकच खासदार आलेले आहेत. ते आहेत त्यांचे निकटवर्ती सुनील तटकरे. याशिवाय काही मोक्याची तिकिटे पदरात पाडून घेणे, त्यातही पुणे – बारामती, शिरूर, पिंपरी, माढा, सोलापूर, रायगड, साताऱ्याच्या पट्ट्यावर प्रभाव पडेल अशा जागा सुटतील तेवढ्या पदरात पाडून घेऊन सहज यशस्वी होण्याची संधी साधायचा विचार दादा करत असतील. पण, मुद्दामहून कळ काढायला शिंदेसेनेचे प्रमुख विजयी मंडळी आणि भाजपातील मूठभर मंडळी शिवाय थोरल्या पवारांना साथ देणाऱ्या नेत्यांच्या मतदासंघांपैकी बऱ्याच ठिकाणी ते आपली तयारी सुरु असल्याचे भासवून विधानसभेच्या जागांची तयारी करतील.
सर्वांचे चिन्ह एकच की सर्व चिन्हावर एकाच पक्षाचे?
शिंदे सेना आणि अजितदादा गट कितीही झुंजत असतील आणि भाजपच्या राज्यातील नेत्यांना दमवत असले तरीही दिल्लीश्वरांपुढे ते त्या ऐटीत वागू शकत नाहीत. तिथे त्यांना मर्यादा पडते. विशेष म्हणजे शिंदे सेनेचे असोत की दादांच्या जवळचे उमेदवार, त्यांच्या वर्तुळातील अनेकांना शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि अजितदादांना मिळेल त्या घड्याळ किंवा दुसऱ्या चिन्हापेक्षाही कमळ हे चिन्ह निवडून येण्यासाठी अधिक आश्वासक वाटते. शिंदे सेनेतील विद्यमान खासदारांपैकी काहींना कमळ अधिक गरजेचे वाटू लागलेले आहे, हे त्यांच्या वाढत्या जवळीकितून दिसून येते. अर्थात त्याची चिंता दोन्ही प्रमुखांना असली तरी उद्या तसे जर सुचवले गेले तर 48 पैकी बहुतांश जागांवर भाजप चिन्हाचेच उमेदवार दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्वजण एकच पक्षाच्या (कमळ) चिन्हावर किंवा प्रत्येक पक्षाच्या चिन्हावर भाजपशी जवळीक असलेला उमेदवारच दिसला तर तेही आश्चर्य नसेल. आपल्या हट्टाप्रमाणे मागण्या मान्य होतात या आनंदात हट्ट-हट्ट खेळत बसलेल्या या नेत्यांना बेसावधक्षणी भाजपने मात दिलेली सध्या दिसेनासी झाली आहे. त्यांचे अनेक उमेदवार, प्रमुख पदाधिकारी भाजपच्याच गळाला लटकून आहेत हे त्यांचे मन मान्य करत नाही. काही झाले तरी हे सहकारी आपल्या सोबतच असतील हा त्यांच्या जो विश्वास आहे, तो त्यांना ऐनवेळी धक्का देऊ शकतो.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी युती करताना अशा अनेक मागण्या त्यांनी मान्य केल्या. पण आपले उमेदवारही शिवसेनेला दिले. आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादीतील ज्यांना निवडून आणायचे त्यांचे मतदारसंघ सेनेला देऊन टाकले आणि तिथे प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमकुवत उमेदवार सेनेकडे राहतील याचीही काळजी घेतली. परिणामी लोकसभेला गावित यांच्यासारखा उमेदवार भाजपने जसा दिला तसेच विधानसभेला आपल्याला नकोसे मतदारसंघही दिले. मात्र तिथले स्पर्धक उमेदवार दिले नाहीत. त्यांना गप्प बसवले. ही रणनीती लक्षात घेतली तर शिवसेना, राष्ट्रवादी फुटीच्या क्रिप्टवर किती आधीपासून रंगीत तालीम सुरू होती हे लक्षात येते. त्यामुळे यावेळी आपला हट्ट चालेल या आविर्भावात ना अजितदादाना राहता येईल ना शिंदेंना! विरोधी आघाडीत सध्या उद्धव ठाकरे यांचा एक विचार आणि शरद पवार यांचा एक विचार अशा दोन समांतर रस्त्यांनी वाटचाल सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकर, समाजवादी हवे आहेत. पवारांना वामन मेश्राम आणि इतर घटक हवे आहेत. त्यामुळे हा समन्वय साधणार कसा आणि जागावाटपाची चर्चा होणार कशी याची चिंता आहे. त्यात काँग्रेस नेतृत्वात चर्चेला कोणाचा समावेश असावा यावरूनच मतभेद निर्माण झाले असून तक्रारी दिल्लीत गेल्या आहेत. मुंबई पट्ट्यात ठाकरेंचे, ग्रामीण महाराष्ट्रात पवारांचे ऐकायचे, विदर्भात काँग्रेसचे ऐकायचे उर्वरित कोकण, वऱ्हाड, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रात जिथे ज्याची शक्ती तिथे त्याला साथ, ज्याच्या त्याच्या मित्र पक्षाचे हट्ट ज्याने त्याने पुरवायचे असा तोडगा काढला जाऊ शकतो. ठाकरे सेना आणि पवारांसह काँग्रेसला सुद्धा यंदा आपला पक्ष सोडून गेलेल्यांना धडा शिकवायची संधी आली आहे. त्यांच्या एकत्र असण्यामुळे आतापर्यंतची आकडेवारी त्यांच्या बाजूने निकालांचा कल दर्शवत आली आहे. पूर्वी इतकेच 51 टक्के मतदान घेण्याचा एनडीएचा प्रयत्न आणि ही आकडेवारी आपल्या बाजूने वळवण्याची किंवा राखण्याची महाविकास आघाडी तथा इंडियाची तयारी पाहता भाजप लोकसभेला मित्र पक्षांचे लाड चालू देणार नाही हे स्पष्ट आहे.
आता या दोन्ही आघाड्या कशी रणनीती आखण्यात आणि आपला तंबू कसा बळकट करतात हे नजिकच्या काळात दिसेलच. तरीही आता अस्वस्थ होण्याची राज्यातील भाजपच्या नेत्यांची वारंवारता अधिक वाढेल. कारण, दोन्ही तंबूतील विजयाच्या स्पर्धेतील उमेदवारांना मागणी अधिक आहे. त्यांना कुणाच्या मागे धावावे लागणार नाही. पण, आम्ही खांब उभा करू आणि निवडून आणू हे म्हणणे मात्र यापुढे चालणार नाही.
यापूर्वी ज्यांच्या हाती प्रगती आणि अधोगती पत्रक देऊन सुधारण्याचा इशारा देण्यात आला होता त्यांना उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाचे पर्याय मिळाले आहेत. त्यामुळे अशा न जुमानणाऱ्या मंडळींची संख्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. हिंदू मुस्लीम वाद वाढवणाऱ्या आंदोलनांना पक्षातून खाजगीत सुरू असणारा विरोध हे त्या प्रगती पुस्तकाला खासदारांनी दिलेले उत्तर आहे!
शिवराज काटकर








