वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत मंगळवारी (1 ऑगस्ट) घडलेल्या घटनेमुळे सभापती ओम बिर्ला संतापले आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी सभापती बिर्ला संसद भवनात असूनही लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसले नाहीत. जोपर्यंत सभागृहात शिस्त प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आपण सभापतींच्या आसनावर जाणार नसल्याचे सभापती बिर्ला यांनी सांगितले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांवर नाराजी व्यक्त करत लोकसभा अध्यक्षांनी आपला निर्णय त्यांना सांगितला. माझ्यादृष्टीने सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. सदनाची शिस्त अबाधित ठेवणे ही प्रत्येक सदस्याची सामूहिक जबाबदारी आहे. सभागृहातील काही सदस्यांची वागणूक सभागृहाच्या उच्च परंपरांच्या विरोधात असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
सभापती बिर्ला यांनी सर्व सदस्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. विरोधी खासदारांनी मंगळवारी सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे सभापती ओम बिर्ला चांगलेच संतापले आहेत. मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी तर केलीच, पण सभापतींच्या आसनाकडे कागदही फेकले होते. दिल्ली सेवा विधेयकादरम्यान सभागृहात बराच गोंधळ झाला होता.