‘इंडिया’च्या बैठकीत निर्धार : आघाडीच्या समन्वय समितीत शरद पवार, संजय राऊत
प्रतिनिधी/ मुंबई
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये दुसऱ्या दिवशी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. 13 जणांच्या समितीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे (युबीटी) संजय राऊत यांचा समावेश करण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत तीन संकल्पांवर निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंतर्गत सर्व पक्ष मिळून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. राज्यात कुठल्या आधारावर जागावाटप होणार हे ठरविण्यासाठी सर्व पक्ष मिळून निर्णय घेणार आहेत. बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना घटक पक्षांना किती जागा देऊ शकता यावर लवकरात लवकर भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. आगामी काळात आघाडी अनेक राज्यांमध्ये भव्य प्रचारसभा आयोजित केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’ ही प्रचार मोहीम अनेक भाषांमध्ये चालणार आहे. जागावाटपाचे सूत्र राज्यस्तरीय स्थानिक आघाडीकरून ठरविण्याचा निर्णय इंडियाच्या तिसऱ्या बैठकीत झाला आहे. याचबरोबर ज्या जागांबद्दल एकमत होत नाही त्याकरता समन्वय समिती निर्णय घेणार आहे.
इंडिया आघाडीला पुढे नेण्यासाठी या समितीच्या माध्यमातून विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली जाणार असून पुढील बैठकांचा सर्वसाधारण अजेंडाही ठरवला जाणार आहे. आगामी लोकसभा तसेच अन्य निवडणुकाही शक्यतो एकत्रित लढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आघाडीचा अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून कोणाला पुढे आणायचे याबाबत निर्णयही लवकरच घेतला जाईल, त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या लोगोबाबत अद्याप एकमत झाले नसल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबतही निर्णय घेतला असून राज्यनिहाय जागा वाटप केले जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. जागा वाटपासह एकूण चार ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. तर या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी निवडणुकीत आमचीच सत्ता येणार असून भाजप सूडबुद्धीने काम करत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनीही आता अटकेची तयारी ठेवावी, असा टोलाही मारला आहे.
गुऊवारी अनौपचारिक बैठक झाल्यानंतर त्यांची खऱ्या अर्थाने शुक्रवारी बैठक सुरू झाली आणि तीन वाजता बैठकीचा समारोप झाला. या तिसऱ्या बैठकीत सत्ताधारी भाजप सरकार विरोधात रणनीति आखल्याचे निदर्शनास आले. समन्वय समितीची स्थापना आणि सर्वांना एकत्र ठेवण्यासाठी करण्यात आलेले ठराव हे या बैठकीचे फलित म्हणता येईल. देशभरातल्या 28 राज्यातील सुमारे 68 विरोधी नेत्यांनी सत्ताधारी भाजपचा पराभव करण्याचा निर्धार मुंबईतील दोन दिवस चाललेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही प्रवफत्तीवर प्रहार करतानाच जनतेची हुकूमशाहातून सुटका हेच इंडियाचे ध्येय असल्याचा निर्धार या नेत्यांनी व्यक्त केला.
इंडियाच्या बैठकीनंतर या बैठकीचे आयोजक उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नितिशकुमार, स्टॅलिन (तामिळनाडू), लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, राहुल गांधी, शरद पवार यांची भाजपवर हल्लाबोल केला. एकाधिकारशाही विरोधी लढा, मित्र परिवारावादाविरोधात लढा, खोटे बोलून जनतेची लूट करणाऱ्यांविरोधात लढा, जनतेचा लुटलेला पैसा जवळच्या उद्योगपतींच्या घशात घालणाऱ्या प्रवफत्तींविरोधात लढा, सरकारी यंत्रणांचा दुऊपयोग करून लोकांमध्ये घबराट निर्माण करणाऱ्यांविरोधात लढा, असा विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.
रेटून बोल हेच मोदींचे तत्व : खर्गे
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, खोटे बोल पण रेटून बोल हेच मोदी यांचे तत्त्व असल्याचे लोकांच्या आता चांगले लक्षात आले असल्याचे सांगत पंतप्रधानांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 200 ऊपये कमी केले. परंतु, त्याआधी त्यांनी गॅसची किंमत अनेक पटींनी वाढवली होती. मोदीजी आधी 100 ऊपये वाढवतात आणि मग 2 ऊपये कमी करतात. वस्तूंच्या किंमती आधी मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि मग त्यात थोडीशी घट करतात. याद्वारे मोदी सरकारने लाखो ऊपये कमावले, गोरगरिबांचा खिसा कापयचा, त्यांचे शोषण करायचे आणि त्यांचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालायचा, हीच त्यांची रणनीति आहे. परंतु, आता तसे होणार नाही. इंडिया आघाडी ही परिस्थिती बदलेल, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
भाजप कधीही गरिबांसाठी काम करणार नाही. ना खाऊंगा, ना खाने दुंगा, अशी मोदींनी घोषणा केली. ते गरिबांनाही खाऊ देत नाहीत. पण त्यांचे लोक पैसे हडप करत आहेत. ईडी, सीबीआय, व्हिजिलन्स या सरकारी यंत्रणांचा दुऊपयोग करत घबराट निर्माण करण्यात येत आहे. पण आता इंडिया आघाडी तसे होऊ देणार नाही, असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
लोगोचे अनावरण पुढच्या बैठकीत
शुक्रवारी इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार होते. पण इंडियाशी जोडलेल्या काही नेत्यांचे काल (गुरुवारी) उशिरा आगमन झाले. त्यांच्या सूचना विचारात घेऊन लोगोचे अनावरण करण्यात यावे असे ठरल्याने लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. आगामी बैठकीत या लोगोचे अनावरण आणि सामायिक अजेंडा ठरण्याची शक्यता आहे.
केंद्रीय समन्वय समिती…
के. सी. वेणुगोपाल (काँग्रेसचे सरचिटणीस)
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष)
एम. के. स्टॅलिन (तामिळनाडूचे मुख्यमंत्री)
संजय राऊत (शिवसेना, यूबीटी)
तेजस्वी यादव (आरजेडी नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री)
अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस)
राघव चढ्ढा (आपचे खासदार)
जावेद खान (समाजवादी पक्ष)
लल्लन सिंह (जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष)
हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
डी. राजा (सीपीआय)
ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्सचे नेते)
मेहबुबा मुफ्ती (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख)
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर नाराजीनाट्या
मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक पार पडल्यावर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या राहुल गांधींवर नाराज दिसून आल्या. बैठकीनंतर राहुल गांधी यांनी अदानी समुहाचा मुद्दा उपस्थित केला होता. राहुल यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी आघाडीतील घटक पक्षांशी सल्लामसलत केली नव्हती असे म्हणत ममतादीदींनी नाराजी बोलवून दाखविली. तर काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्यास इच्छुक नसल्यानेही ममता बॅनर्जी नाराज असल्याचे मानले जात आहे.
गांधी जयंतीला मोठा कार्यक्रम
विरोधी पक्षांची आघाडी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीवेळी मोठा कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे मानले जात आहे. मुंबईच्या बैठकीत 2 ऑक्टोबर रोजीच्या मोठ्या कार्यक्रमावरून चर्चा झाली आहे. तर विरोधी पक्षांच्या आघाडीच्या स्थापनेची रुपरेषा आता अंतिम टप्प्यात आहे. यामुळे मोठ्या प्रचारसभा आयोजित होण्याची शक्यता आहे. या सभा पाटणा, नागपूर, चेन्नई येथे आयोजित होऊ शकतात.
सिब्बलांची उपस्थिती, काँग्रेस अस्वस्थ
इंडियाच्या मुंबई येथील बैठकीत समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार कपिल सिब्बल यांनी भाग घेतल्याने काँग्रेस नेते अस्वस्थ झाल्याचे चित्र दिसून आले. सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वावर आणि विशेषकरून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर आरोप करत पक्ष सोडला होता. यामुळे काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सिब्बल यांच्या बैठकीतील उपस्थितीला विरोध दर्शविला होता. तर अखिलेश यादव यांनी वेणुगोपाल यांची समजूत काढत वेळ निभावून नेली आहे.









