बेळगावला बोलावून कुटुंबीयांची घेतली माहिती : आठ दिवसांतील घडामोडींवरून गूढ अधिक गडद
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असताना संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या बसनगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लद बागेवाडी) याच्या लॉकअप डेथची चौकशी गुरुवारीही सुरू होती. कुटुंबीयांना बेळगावात बोलावून त्यांच्याकडून या घटनेसंबंधी सीआयडीच्या अधिकाऱयांनी माहिती घेतली. या प्रकरणाला शुक्रवारी आठ दिवस पूर्ण होतात.
शुक्रवार दि. 11 नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली होती. घटनेनंतर केवळ दोन दिवसांत सीआयडीचे अधिकारी बेळगावात दाखल झाले आहेत. बुधवारी बेल्लद बागेवाडी येथे जाऊन या पथकातील अधिकाऱयांनी कुटुंबीयांची भेट घेऊन बसनगौडाविषयी माहिती घेतली होती.
गुरुवारी सकाळी बसनगौडा यांची पत्नी, मुलगी व इतर नातेवाईक सरकारी विश्रामधाम येथे दाखल झाले. त्यांनी सीआयडी अधिकाऱयांची भेट घेतली. त्यानंतर वाहनांतून त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.
बसनगौडा यांच्या मुलीने पोलिसांच्या जाचामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यादिशेने या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे. शुक्रवारी 18 नोव्हेंबर रोजी या घटनेला आठ दिवस पूर्ण होतात. या आठ दिवसांतील घडामोडी लक्षात घेता बसनगौडाच्या मृत्यूला न्याय देण्याऐवजी हे प्रकरण दडपण्याचेच प्रयत्न सुरू आहेत.
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे या काळात बंद होते, अशी माहिती देण्यात आली आहे. स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी अधिकाऱयांनी पोलीस आयुक्तांना पत्र देऊन 8 नोव्हेंबरपासूनच कॅमेरे बंद असल्याचे सांगितले आहे. गेल्या आठ दिवसांतील एकंदर घडामोडी लक्षात घेता या प्रकरणातील गूढ अधिक गडद होत चालले आहे.









