प्रतिनिधी,रत्नागिरी
नजीकच्या मिऱ्या येथील दिवाळखोरीत गेलेल्या भारती शिपयार्डची जागा व इतर मालमत्ता ‘योमन मरीन’ या कंपनीला हस्तांतरित केल्याने कंपनीने मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी एनसीएलटच्या मार्गदर्शक तत्वानुसार कायमस्वरूपी दगडी कंपाऊंड तसेच मालाची ने-आण व अनुषंगिक कामासाठी गेट उभारले आहेत.परंतु काही ग्रामस्थांनी दमदाटी करून बळजबरीने ही गेट उघडण्यास भाग पडल्याने शांतता व सुरक्षितता अबाधित राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.हीच स्थिती यापुढेही कायम राहिल्यास प्रकल्प उभारणी कामासंदर्भात कंपनीला नकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता सडामिऱ्या तसेच जाकिमिऱ्या ग्रामपंचायतीला कंपनीने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
भारती शिपयार्ड कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर येथे नव्या उद्योगाला चालना देण्यासाठी व त्या कंपनीचे पुनर्जीवन करण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावले उचलली.त्यामुळे भारती शिपयार्डच्या जागी आता ‘योमन मरीन’या कंपनीचे कामकाज सुरू झाले आहे.कंपनीच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणानुसार प्रकल्प उभारणीची पूर्तता ग्रामपंचायतीबरोबर समन्वय साधून करण्याचा कंपनीचा मानस आहे.सौहार्दाच्या वातावरणातच प्रकल्प उभारणीचे काम मार्गी लावण्याच्या कंपनीच्या दृष्टिकोनातून प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे.
भारती डिफेन्स आणि इन्फास्ट्रक्टर लिमिटेड (पूर्वीची भारती शिपयार्ड लिमिटेड) ही दिवाळखोरीतील कंपनी,नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या (एनसीएलट) आदेशानुसार ई-लिलाव पद्धतीने मिळवलेली आहे.‘योमन मरीन’ ही कंपनी संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱया भारतीय नौदल व तटरक्षक दलाच्या युद्धनौकांच्या बांधणीचे व दुरुस्तीचे कार्य करत आहे.हे काम देशाला राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करतात.मिऱ्या येथे सुमारे 40 वर्षापासून भारती शिपयार्ड ही कंपनी जहाज बांधणी व दुरुस्ती या उद्योगासाठी कार्यरत होती.मागील सुमारे 12 वर्षांपासून ही कंपनी बंद होती.दिवाळीखोरीत निघाल्याने एनसीएलट या कंपनीला वर्ग करण्यात आली.एनसीएलटने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून योमन मरीन सर्व्हिसेस प्रा.लि.या कंपनीला जानेवारी 2023 मध्ये बांधणी व दुरुस्ती प्रकल्प उभारणीसाठी तसेच इतर तदनुषंगिक कामांसाठी हस्तांतरित केली आहे.
या प्रकल्प उभारणीत सडामिऱ्या ग्रामपंचायतीची व ग्रामस्थांची सकारात्मक व सहकार्याची भूमिका राहिली. कंपनीला प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक असणाऱ्या जमिनी कायमस्वरूपी मालकी तत्वावर तसेच भाडे कराराने संबंधित जमीन मालकाशी सकारात्मक चर्चा करून विकत घेण्यास तयार आहे. जमिनीच्या दरासंदर्भात संबंधित गाव समितीशी कंपनीच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा सुरु आहे.लवकरच उभयपक्षी तोडगा निघून सर्वानुमते निर्णय घेतला जाईल,असा कंपनीला विश्वास आहे.काही ग्रामस्थ संबंधित जमीन मालकाची दिशाभूल करत असल्याचे कंपनीचे पत्राद्वारे म्हणणे आहे.जमीनमालकांना आपल्या जमिनी कंपनीला मालकी तत्वावर कायमस्वरूपी विकण्यासाठी परावृत्त करीत असल्याचे बाब निदर्शनास आली आहे.याचाच परिणाम म्हणून कंपनीला प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱया जमिनी कायमस्वरूपी खरेदी करण्यास व कंपनीच्या प्रकल्प उभारणीच्या कामास विलंब होत आहे.
अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई
एनसीएलटने भारती शिपयार्डची जागा व इतर मालमत्ता कंपनीला हस्तांतरित केल्याने कंपनीने मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी एनसीएलटच्या मार्गदर्शक तत्वानुसार कायमस्वरूपी दगडी कंपाऊंड तसेच मालाची ने-आण व अनुषंगिक कासाठी गेट उभारले आहेत.ते कायमस्वरूपी बंद गेट काही ग्रामस्थांनी दमदाटी करून बळजबरीने उघडण्यास भाग पडल्याने शांतता व सुरक्षितता अबाधित राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या नकारात्मक भूमिकेमुळे कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.ग्रामपंचायतीच्या विनंतीनुसार स्थानिकांना प्राधान्य देण्यासंदर्भात कंपनीने सकारात्मक भूमिका ठेवली आहे.यापुढे प्रकल्प उभारणी कामासंदर्भात कंपनीला नकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी कंपनीची उघडी असलेली गेट कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत तसेच या कामामध्ये काही अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात पत्र सडामिऱया ग्रामपंचायतीला कंपनीच्यावतीने देण्यात आले आहे.