दुर्गंधी, डास, माशा, किटकांच्या प्रादुर्भावात वाढ
प्रतिनिधी/ तिसवाडी
ओल्ड गोवा ग्रामपंचायत क्षेत्रातील धावजी येथील खुल्या जागेत टाकण्यात येत असलेल्या कचऱयामुळे तेथे दुर्गंधी पसरली असून त्याचबरोबर डास, माशांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. याचा तेथील लोकांना त्रास होत असून पावसाळय़ात ही परिस्थिती अशीच राहिल्यास डेंग्यू किंवा अन्य रोगराई पसरण्याची भीती तेथील लोकांनी व्यक्त केली आहे.
ओल्ड गोवा धावजी येथे कोकण रेल्वेच्या क्रॉसिंगजवळ असलेल्या ख्रिश्चन बांधवाच्या क्रॉसजवळच हा कचरा प्रकल्प असून त्यापासून निर्माण होणाऱया समस्यांचा त्या परिसरातील दहा-बारा घरांतील लोकांना त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी कचऱयावर कसलीही प्रक्रिया न करता कचरा खुल्या वातावणात टाकण्यात येत असल्याने कचऱयाचे ढीग तयार झाले आहेत.
सध्या दुर्गंधी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळेबरोबर भर दिवसाही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोठय़ा माशांची संख्या वाढली असून त्या लोकांच्या अंगावर बसतात तसेच घरांमध्येही शिरतात. त्याचबरोबर मुंगुस, घुशी, अजगर सारखे प्राणीही तेथे वावरतात. काही वेळा कचऱयामध्ये किडे असल्याचेही दिसून येते. एकंदरीत वातावरणात आपल्याला जगणे मुश्किल होऊन बसले आहे, असे तेथील लोकांनी पत्रकारांना सांगितले. या कचऱयाच्या ठिकाणी ख्रिश्चन बांधवांचे प्रार्थनास्थळ क्रॉस आणि दुसऱया बाजूने ओल्ड गोवा हेलिपॅडही आहे.
स्थानिक ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राने याची त्वरित दखल घेण्याची गरज आहे. अन्यथा पावसाळय़ात हे वातावरण अधिक दुषित होऊन डेंग्यु, मलेरियासारखी रोगराई निर्माण होऊन त्या परिसरातील लोकांच्या आरोग्यला धोका पोहोचू शकतो.
तक्रारी करुनही योग्य दखल नाही
स्थानिक रहिवासी प्रमोद नीळकंठ नाईक व इतर रहिवाशांनी 18 मे 2022 रोजी याबाबत ओल्ड गोवा सरपंचाना पत्र लिहून या ठिकाणी कचरा टाकणे त्वरित बंद करावे, असे लेखी कळविले होते. या प्रकल्पामुळे हवा, पाणी प्रदूषण होत असून रोगराईसुद्धा निर्माण होऊ शकते, त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरु शकते असे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीच्या प्रती खोर्ली आरोग्य केंद्र, गोवा मानव हक्क आयोग, राष्ट्रीय हरित लवाद, तिसवाडीचे मामलेदार, कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन मडगाव, मच्छीमारी खाते-धावजी, ओल्ड गोवा हेलिपॅड प्राधिकरण, या परिसरातील खासगी मच्छीमारी कंपन्या, स्थानिक जिल्हा पंचायत सदस्य आणि उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक, स्थानिक आमदार राजेश फळदेसाई यांच्यासह मुख्यमंत्री व राज्यपालांनाही पाठविलेल्या आहेत.









