प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील खारवीवाडा किनाऱयावरील घरांच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱयांना स्थानिक लोकांच्या संतापाला सामोरे जावे लागले. मंगळवारी सकाळी हे अधिकारी सर्वेक्षणासाठी आले होते. मात्र, त्यांना लोकांनी परत पाठवले. लोकांना विश्वासात न घेता करण्यात येणाऱया कसल्याच सर्वेक्षणाला थारा देण्यात येणार नसल्याचे स्थानिक लोकांनी बजावले आहे.
खारवीवाडा किनाऱयावरील मच्छीमारी जेटी व इतर साधनसुविधांच्या नियोजित प्रकल्पांच्या कामाला सुरवात करण्यासाठी एमपीएने हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या किनाऱयावरील अतिक्रमणांचे मंगळवारी सकाळी सर्वेक्षण करण्यासाठी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी एमपीएच्या अधिकाऱयांसमवेत खारवीवाडय़ावरील वस्तीत आले होते. काही अधिकारी तेथील घरांचे सर्वेक्षण करीत असल्याचे समजताच स्थानिक मच्छीमारी लोक एकत्र आले व त्यांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध केला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. समाजसेवक विरीयातो फर्नांडिस तसेच स्थानिक नगरसेवक माथीयास मोंतेरो यांनी या प्रश्नात मध्यस्थी करून उपस्थित अधिकाऱयांना जाब विचारला. स्थनिक लोकांना कोणतीही कल्पना न देता सरळ सर्वेक्षण करण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. अधिकाऱयांनी हाती घेतलेले किनाऱयावरील सर्वेक्षण किनारी क्षेत्रासंबंधी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा भंग करणारे असल्याचे विरीयेतो फर्नांडिस यांनी म्हटले आहे.
स्थानिक नगरसेवक माथीयास मेतेरो व होडी मालक संघटनेचे अध्यक्ष किस्तोद डिसोजा यांनी यासंबंधी माध्यमांकडे बोलताना कसले सर्वेक्षण व काय याचे स्थानिक लोकांना काहीच माहित नसल्याचे स्पष्ट करून कुणाला काहीही न सांगता आपल्या परिसराचे कसे काय सर्वेक्षण केले जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांना विश्वासात न घेता काहीही करू दिले जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी बजावले. एमपीएच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार किनाऱयावरील विकास प्रकल्पासाठी सर्वेक्षण करणे आवश्यक होते. त्यासाठीच अधिकारी आले होते. या प्रकल्पासाठी वास्कोतच 2018 साली जनसुनावणी झाली होती असे त्यांनी सांगितले. सर्वेक्षणाला लोकांनी विरोध केल्याने या विकास प्रकल्पाचे काम लांबणीवर पडू शकते असे या अधिकाऱयांनी सांगितले. अधिकारी व स्थानिकांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र, स्थानिक लोक विरोधावर ठाम राहिले. त्यामुळे अधिकाऱयांना सर्वेक्षण न करताच माघारी परतावे लागले. काही लोकांनी आपली घरे जाण्याची भिती व्यक्त केली आहे.









