जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, काम थांबविण्याची मागणी
बेळगाव : टिळकवाडी दुसरे रेल्वेगेट येथील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे स्थानिक रहिवासी, तसेच व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. पहिले रेल्वेगेट ते अनगोळ येथील चौथे रेल्वेगेटपर्यंत केवळ दोन किलोमीटर अंतरामध्ये एकूण 4 उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. याचा परिणाम व्यवसायावर होणार असून केंद्र व राज्य सरकारने दुसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी टिळकवाडी येथील रहिवासी व व्यापाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
स्थानिक रहिवासी, तसेच व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. या परिसरात शाळा, महाविद्यालये, बँका यांच्यासह खासगी कार्यालये व दुकाने आहेत. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांसह सर्वांचीच गैरसोय होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार या उड्डाणपुलाला सर्व्हिस रोडदेखील असणार नाही. तसेच 5 फुटाचा सेडबॅक दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांचे हाल होणार असून व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे.
व्हॅक्सिन डेपो येथे या रस्त्याचा शेवट होतो. यामुळे टी आकारात काँग्रेस रोडवर उड्डाणपूल राहील अशा पद्धतीने डिझाईन करण्याची मागणीही करण्यात आली. नागरिकांचा विरोध समजून घेऊन केंद्र व राज्य सरकारने उड्डाणपुलाचे काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अमित पाटील, महादेव काशीद, सुभाष काशीद, गुरुनाथ काशीद, रमेश आर. यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.









