दुर्घटना घडण्यापूर्वीच डागडुजी करण्याची आवश्यकता
बेळगाव : मारुती रोड, जुने गांधीनगर येथे मागील अनेक दिवसांपासून गटारीच्या चेंबरचे आकारमान बिघडल्याने त्यावर झाकण घालणे दुरापास्त बनले आहे. यामुळे हे चेंबर झाकणाविना उघड्या अवस्थेत आहे. रात्रीच्यावेळी चेंबर दृष्टीस पडत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे या चेंबरची दुरुस्ती करून त्यावर झाकण बसवावे, अशी मागणी परिसरातील वाहनधारक आणि नागरिकांतून होत आहे. गांधीनगर मारुती रोड येथील चेंबरवरून बऱ्याचवेळा अवजड वाहने घातली जातात. यामुळे चेंबरची मोडतोड होत आहे. चेंबरचे काँक्रीट खराब झाल्याने त्यावर झाकण बसत नव्हते. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी चेंबरच्या बाजूलाच झाकण तसेच ठेवले आहे. महिना उलटला तरी अद्याप या चेंबरची दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हे चेंबर अपघातात आमंत्रण ठरत आहे. दुचाकी व सायकलचालक या चेंबरमध्ये अडकून अपघात होत आहेत. या परिसरात लहान मुलांची वर्दळ अधिक असल्याने एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वीच महानगरपालिकेने चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.









