केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडे यांची घोषणा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी वर्षात बॅटरी सेलचे स्थानिक उत्पादन सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी केली. यामध्ये की 50 गिगावॅट (जीडब्लूएच) बॅटरी सेलचे स्थानिक उत्पादन 2024 मध्ये सुरू होईल. आम्ही आमच्या ऊर्जेच्या गरजांमध्ये स्वयंपूर्ण नाही, पण भारत सुमारे 50 जीडब्लूएचचे स्थानिक उत्पादन लवकर सुरू करेल. या दरम्यान पांडे म्हणाले, भारत सरकारने देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वाढीला सतत पाठिंबा दिला आहे. आपण अभिमानाने सांगू शकतो की सध्या भारतीय रस्त्यांवर 9.4 लाख इलेक्ट्रिक वाहने आहेत. बॅटरी डेव्हलपमेंट आणि स्वदेशी उत्पादनासाठी पीएलआय योजना इतरांवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे आणि आपल्याला स्वावलंबी बनवत आहे. आगामी काळात भारत हे बॅटरी उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र बनणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या भारतात फक्त बॅटरीची असेंब्ली
सध्या भारतात फक्त बॅटरीची असेंब्ली होते. सेल चीन, तैवान आणि युरोपीय देशांतून आयात केले जातात. सरकारने 2021 पासून सेलच्या स्थानिक उत्पादनावर भर देण्यास सुरुवात केली आहे आणि त्यानंतर सरकारने 30 जीडब्लूएच प्रगत केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेजच्या उत्पादनासाठी 18,100 कोटी रुपयांची पीएलआय योजना जाहीर केली होती.









