पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये मंदिर परिसरातील सुमारे पाचशेहून अधिक घरे भूसंपादित होणार आहेत. स्थानिकांना विश्वासात न घेतल्याने व पंढरपूर कॉरिडॉरला विरोध दर्शविण्यासाठी मंदिर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील लोकांनी एकत्रित येत मूक मोर्चाद्वारे निषेध नोंदविला. यावेळी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने पंढरपूर नगरपरिषद प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वारकरी भाविक भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे. यामध्ये स्थानिकांना विश्वासात घेण्यात आले नाही. वाराणसीच्या धर्तीवर एक लोभस चित्र निर्माण करुन पंढरपुर काॅरीडारसह तयार केलेला विध्वंसक पंढरपुर विकास आराखडा तात्काळ थांबविण्याची मागणी मंदिर परिसर व नगरप्रदक्षणा मार्गावरील लोकांकडून करण्यात येत आहे.
या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. पंढरपूरचा विकास निश्चित करा परंतु घरादाराला हात लावू नका. पर्यायी शासकीय जागांचा वापर करून वारकरी भक्तांसाठी सुविधा निर्माण करा अशी मागणी मोर्चातील नागरिकांनी केली आहे.