ग्रामीण विकास -पंचायतराज खात्याचा आदेश
बेळगाव : स्थानिक पंचायतराज संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतींना स्वतंत्र मुद्रा वापरण्यासाठी ग्रामीण विकास-पंचायतराज खात्याने मुभा दिली आहे. यासंबंधीचा आदेश 2 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. स्थानिक संस्थांना स्वतंत्र मुद्रा वापरण्याची आवश्यकता असल्याचे ग्राम पंचायत सदस्य राज्य शाखेने ग्रामीण विकास-पंचायतराज खात्याकडे काही महिन्यांपूर्वी स्पष्ट केले होते. या मागणीची दखल घेऊन ग्रामीण विकास खात्याचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी गेल्या 13 फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर आता स्थानिक संस्थांना स्वतंत्र मुद्रा वापरण्यास आदेश दिला आहे.
सरकारच्या आदेशानुसार आता यापुढे जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतींना स्वतंत्र मुद्रा वापरण्यास संधी मिळाली आहे. विशेषत: सरकारनेच आशयगर्भ व विशिष्ट मुद्रा तयार केली आहे. सरकारने तयार करून दिलेल्या मुद्रा जिल्हा पंचायत, तालुका पंचायत व ग्राम पंचायतींना सरकारच्या विविध योजनांच्या बॅनर, जाहिराती फलक, सरकारी इमारतीच्या पुढील भागात वापरता येणार आहेत. जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतींचे विद्यमान निर्वाचित प्रतिनिधी आपल्या अधिकार कालावधीत व्हिजिटींग कार्डवर मुद्रा वापरू शकतील. तसेच सरकारी व निमसरकारी पत्रांवरही मुद्रा वापरण्यास मुभा आहे.ही मुद्रा पत्राच्या वरील भागात किंवा मध्यावर ठळकपणे छापण्यास आदेशातून कळविण्यात आले आहे. वैयक्तिक कामासाठी मुद्रा वापरण्याला निर्बंध आहे. बेकायदेशीरपणे मुद्रा वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरकारने दिला आहे.









