‘शिवरायांची शौर्यगाथा’ महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद : 170 स्थानिक कलाकारांचा सहभाग
वार्ताहर /किणये
रणकुंडये गावातील स्थानिक कलाकारांनी ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे ऐतिहासिक महानाट्या सादर केले. या महानाट्यामध्ये गावातील 170 कलाकारांनी सहभाग घेतला होता. शिवरायांची शौर्यगाथा महानाट्या पाहण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे सहा हजाराहून अधिक नागरिकांची गर्दी झाली होती. शिवराय प्रतिष्ठान रणकुंडये, देवस्थान कमिटी, ग्रामस्थ व युवक मंडळे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘शिवरायांची शौर्यगाथा’ हे ऐतिहासिक महानाट्या सादर करण्यात आले. या महानाट्यासाठी भव्य असा शामियाना उभारण्यात आला होता. तसेच शिवरायांचा शिवकालीन इतिहास समजून यावा यासाठी भव्य अशा किल्ल्याच्या प्रतिकृतीची उभारणी करण्यात आली होती. या महानाट्यामध्ये अश्व दाखविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्या करण्यासाठी रणकुंडये गावातील तरुण, महिला व वडीलधारी मंडळी अशा साऱ्यांनीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. नाट्याप्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशराम कंग्राळकर होते. रोटरी क्लब ऑफ सेंट्रल बेळगावचे माजी अध्यक्ष रवी हत्तरगी, जि. पं. माजी सदस्य मोहन मोरे यांच्या हस्ते महानाट्याचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष म्हणून शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील हे होते. प्रारंभी गावातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. ध्वजपूजन यल्लाप्पा कोलेकर यांनी केले. शिवाजी मंडोळकर, राजेंद्र मुरकुटे, श्रीधर गुरव, निवृत्ती डुकरे, अॅड. प्रसाद सडेकर, संतोष जैनोजी, सुनील खांडेकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. गणेश मूर्तीपूजन विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले.









