रस्ता पूर्ण होण्याअगोदरच टोलवसुली करण्याचा निर्णय : स्थानिकांना सूट देण्याची मागणी
खानापूर : खानापूर-बेळगाव नव्या महामार्गावर गणेबैल येथे मंगळवार दि. 11 जुलैपासून टोलवसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खानापूरहून बेळगावसाठी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रस्ता अपूर्ण असताना टोलवसुली का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. तर स्थानिक नेत्यांनी याबाबत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव-गोवा, पणजी हा महामार्ग नव्याने निर्माण करण्याची घोषणा करून बेळगाव-गोवा रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापूर्वीपासून हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता ई. पी. सी. या तत्त्वावर बनवण्यात आला असल्याने कंत्राटदाराकडून या रस्त्याचे काम करून घेण्यात येते. आणि टोलवसुलीचे काम हे महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात येते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना रस्ता पूर्ण होण्याअगोदरच टोलवसुलीची इतकी घाई का, असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित करण्यात येत आहे.
अद्याप झाडशहापूर-मच्छे रस्ताकाम अपूर्ण
बेळगाव-खानापूर या रस्त्याचे काम अशोक बिल्डकॉन कंपनीने केले आहे. बेळगाव ते होनकलपर्यंतच्या 30 कि. मी.चे काम या कंपनीला देण्यात आले होते. मात्र अद्याप झाडशहापूर तसेच मच्छे येथे काम अपूर्ण असल्याने खानापूर ते बेळगाव या 25 कि. मी. च्या अंतरात फक्त 14 कि. मी. चा रस्ता पूर्ण झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर टोल आकारणी करण्यात येणार असल्याची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर खानापूर आसपासच्या नागरिकांसह प्रवासी व वाहनधारकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भागातील स्थानिकांना यातून सूट देण्याची मागणी करण्यात येत आहे. खानापूरहून बेळगावला वाळू, वीट यासह प्रवासी वाहतूक करणारे टेंपो तसेच खासगी वाहने, मालवाहतूक करणारी वाहने बेळगावला रोज हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या किमान स्थानिकांना तरी सूट देण्याची मागणी जोर धरत आहे.
जितका रस्ता तयार तितकीच टोलवसुली
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता ते म्हणाले, जितका रस्ता सध्या वाहतुकीस तयार झालेला आहे. त्याच रस्त्यावर टोल आकारण्यात येणार असून हा टोल 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. त्यानंतर पुन्हा नवीन दर निश्चित करण्यात येणार आहेत.
टोलवसुली थांबवण्यासाठी प्रयत्न करणार
रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. इतक्या तातडीने महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुली करण्यासाठी अधिसूचना जारी करणे हे चुकीचे आहे. याबाबत आम्ही तातडीने महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापकांना भेटून त्यांना लेखी तक्रार देणार आहोत. टोलवसुली थांबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच याबाबत केंद्रीय मंत्रालयाशी संपर्क साधून काम पूर्ण झाल्यानंतर टोलवसुली करण्यात यावी, अशी मागणी करणार आहोत. तसेच स्थानिकांना यातून सूट मिळावी यासाठी चर्चा करणार आहोत.
– आमदार विठ्ठल हलगेकर, खानापूर
रस्ताकाम पूर्ण झाल्यानंतरच टोलवसुली करा
गणैबैल ते झाडशहापूर हा 12 कि. मी. चा रस्ता पूर्ण झालेला आहे. पुढील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आणि प्राधिकरणाने टोलवसुली सुरू करण्यासाठी प्रयत्न चालवले आहे. हे चुकीचे असून बेळगावला खानापूर तालुक्यातून हजारो लोक व्यवसाय, शिक्षण व इतर कामानिमित्त जात असतात. यासाठी स्थानिकांना पूर्णपणे सूट देणे गरजेचे आहे. तसेच रस्ता पूर्ण झाल्यानंतरच वसुली करण्यात यावी. या टोलवसुली विरोधात समितीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
-माजी आमदार दिगंबर पाटील, इदलहोंड
रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार : प्रमोद कोचेरी
रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असताना तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात गेलेली आहे. त्यांना अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच हलकर्णी, होनकल, हत्तरगुंजी या ठिकाणी सर्व्हिस रस्ता तयार केलेला नाही. तसेच हत्तरगुंजी येथील ब्रिज पूर्ण झालेला नसताना टोल सुरू केलेला आहे. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची बुधवारी दिल्लीत भेट घेऊन याबाबत त्यांच्याकडे चर्चा करणार आहोत. स्थानिकांना सूट देण्यासाठी मागणी करण्यात येणार आहे.









