रिझर्व्ह बँकेची 8 ऑगस्टपासून बैठक : रेपोरेट 6.50 टक्केच राहणार
मुंबई:
भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण समितीची बैठक 8 ते 10 ऑगस्ट या कालावधीत भरली जाणार असून सदरच्या बैठकीत रेपो दर जैसे थे राहणार असल्याचे संकेत तज्ञांकरवी मिळत आहेत. याचाच अर्थ गृहकर्ज व्याजदर वाढणार नसल्याने कर्ज महागणार नाही, हे उघड आहे.
रिझर्व्ह बँकेची पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात रेपो दर 6.50 टक्के इतकाच ठेवला जाणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. अमेरिकेतील फेडरल बँक व युरोपातील केंद्रीय बँकेने अलीकडेच आपले व्याजदर वाढवलेले असले तरी देशांतर्गत महागाई नियंत्रणात असल्याच्या कारणास्तव भारतीय रिझर्व्ह बँक याखेपेस व्याजदर वाढीचा निर्णय घेणार नाही, असे म्हटले जात आहे. याआधीच्या दोन बैठकांमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवलेले नाहीत. एप्रिल आणि जून या महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो रेट आहे तोच ठेवण्यात आला होता.
कधी कळणार निर्णय
गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली 8 तारखेला पतधोरण समितीच्या 6 सदस्यांची बैठक सुरु होत असून व्याजदराबाबतचा निर्णय मात्र 10 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. घर खरेदीदार, बांधकाम व्यावसायिक तसेच बँकांचे या निर्णयावर लक्ष राहणार आहे.









