बेळगाव जिल्ह्यातील 750 अंगणवाड्यांचा समावेश : 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार वर्ग
बेळगाव : मागील अनेक दिवसांपासूनची पालकांची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. राज्य सरकारने अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, युकेजी वर्ग सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. 2 ऑक्टोबरपासून एलकेजी, युकेजी वर्ग भरविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात उत्तर कर्नाटकातील पाच जिल्ह्यांमधील एक हजार अंगणवाड्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर बेळगाव जिल्ह्यातील 750 अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, युकेजी वर्ग सुरू केले जाणार आहेत. हा निर्णय महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. 2 ऑक्टोबर रोजी कर्नाटकात अंगणवाड्या स्थापन करून 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एलकेजी, युकेजी वर्ग सुरू केले जाणार आहेत. राज्यात एकूण 10 हजार अंगणवाड्यांमध्ये हे वर्ग सुरू केले जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाने एलकेजी, युकेजी वर्गांचा अभ्यासक्रम, पाठ्यापुस्तके, गणवेश, सॉक्स व बूट यांची व्यवस्था केली आहे.
4 ते 5 वयोगटातील विद्यार्थी एलकेजीसाठी पात्र असतील. तर 5 ते 6 वयोगटातील विद्यार्थी युकेजीमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. सध्या कर्नाटकात 69 हजार 892 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 10 हजार अंगणवाड्यांमध्ये एलकेजी, युकेजी वर्ग सुरू केले जाणार आहेत. यासाठी नवीन शिक्षकांची भरती करणे गरजेचे नसणार आहे. कारण यापूर्वी भरती करण्यात आलेले 17 हजार शिक्षक हे पदवीधर असल्याचे समोर आले आहे. कन्नड व इंग्लीश या दोन्ही माध्यमांमध्ये अंगणवाड्या सुरू केल्या जाणार आहेत. एका केंद्रामध्ये 35 विद्यार्थ्यांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण 5,556 अंगणवाड्या असून त्यापैकी 750 अंगणवाड्यांमध्ये नवे वर्ग सुरू केले जाणार आहेत. इंग्रजी माध्यमांकडे वाढलेला ओढा कमी करण्यासाठी राज्य सरकारने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे.









