खासगी शाळांनी जाहीर केले वेळापत्रक : पालकांची धावपळ
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील काही नामवंत खासगी शाळांनी एलकेजी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून एलकेजी पूर्वप्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी शाळेमधून अर्ज घ्यावेत, असे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे.
आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कॉन्व्हेंट व इतर खासगी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. प्रवेश मिळविण्यासाठी रात्रंदिवस तारेवरची कसरत सुरू असते. एलकेजीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीपासूनच पालक शाळेच्या संपर्कात असतात. बेळगाव शहरातील काही शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी 24 तास रांगांमध्ये उभे असल्याचे चित्र वारंवार दिसते.
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे ऑनलाईन क्लासेस सुरू होते. त्यामुळे बऱ्याच पालकांनी खासगी शाळांऐवजी सरकारी शाळांना प्राधान्य दिले. परंतु आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा खासगी शाळांकडील ओढा वाढला आहे. त्यामुळेच कॉन्व्हेंट शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. 1 फेब्रुवारीपासून बऱ्याच शाळांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. काही शाळांनी ऑनलाईन तर काही शाळांनी ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत.
आवश्यक पात्रता-कागदपत्रांसाठी तयारी
एलकेजीमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी वय वर्षे 4 ते 5 यामधील असावा. (याचा जन्म 1-6-2018 ते 31-5-2019 दरम्यानचा), जन्म दाखला, रेशनकार्ड अथवा पालकांचे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, अनुसूचित जाती-जमातीचा दाखला, बीपीएल कार्डधारक असेल तर उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, संपूर्ण कुटुंबाचा फोटो अशी कागदपत्रे शाळांना द्यावी लागणार असल्याने पालक आतापासूनच तयारीला लागले आहेत.









