सलग 12 दिवस उपचार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना 12 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अडवाणी यांना 12 डिसेंबर रोजी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर शुक्रवारी रुग्णालयाने त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्यावर अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. सुरुवातीला त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, मात्र तब्येत सुधारल्यानंतर त्यांना खासगी वॉर्डमध्ये हलविण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अडवाणी आता दिल्लीतील आपल्या शासकीय निवासस्थानीच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहेत.
97 वर्षीय लालकृष्ण अडवाणी आपल्या मुलीसोबत दिल्लीत राहतात. त्यांना गेल्या 6 महिन्यांत 4 वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांना जून 2024 मध्ये एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अपोलोमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही पुन्हा आरोग्यविषयक समस्या समोर आल्यानंतर 12 डिसेंबर रोजी अडवाणींना पुन्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर जवळपास 12 दिवस त्यांनी उपचार घेतले.









