प्रकृती स्थिर : गेल्या सात महिन्यात चौथ्यांदा प्रकृती खालावली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. 97 वर्षीय अडवाणी यांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांना न्यूरोलॉजी विभागात डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यास त्यांना एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळू शकतो. गेल्या सात महिन्यात त्यांना चारवेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. 26 जून रोजी दिल्लीतील एम्समधील यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर 3 जुलै रोजी तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना अपोलोमध्ये दाखल करण्यात आले. तर 6 ऑगस्ट रोजी रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.









