माती डोळ्यात जात असल्याने अपघाताचा धोका
बेळगाव : अवजड वाहनातून मातीची उघड्यावर वाहतूक केली जात असल्याने दुचाकीस्वारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतुकीदरम्यान माती उडून दुचाकीस्वारांच्या डोळ्यामध्ये जात आहे. यामुळे मातीची वाहतूक करणाऱ्या सदर वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी दुचाकीस्वारातून केली जात आहे. अगसगे-बेळगाव रोडवर हा प्रकार घडत असून दुचाकीस्वारातून या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहरामध्ये विविध विकासकामांसाठी मातीची मागणी केली जात आहे. त्यानुसार अगसगे, अतिवाड, बेकिनकेरे या भागातून लालमातीचा पुरवठा करण्यात येत आहे. अगसगे-बेळगाव रोडवर अवजड वाहनातून लाल मातीची वाहतूक केली जात आहे. अवजड वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवत असल्याने सदर माती उडून दुचाकीस्वारांच्या डोळ्यामध्ये जात आहे. यामुळे दुचाकी वाहनधारकांना हा नित्याचाच त्रास सहन करावा लागत आहे. नियमानुसार माती व खडीची वाहतूक करताना त्यावर आवरण घातले पाहिजे. मात्र, अवजड वाहनचालकांकडून अशा कोणत्याच नियमांचे पालन केले जात नाही. उलट बेदरकारपणे वाहने चालविण्यात येत असल्याने इतर वाहनचालकांनाच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पोलीस प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन उघड्यावर मातीची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.









