ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक तळावलीकर यांची माहिती
पणजी : भारतातील सर्वोत्तम मल्टि स्पेशालिटी रूग्णालय म्हणून परळ-मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटला ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत 1200 हून अधिक यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण केले आहे. गोव्यातही आता यकृत प्रत्यारोपण सेवा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती आयएचएच हेल्थकेअर इंडिया तसेच ग्लोनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक तळावलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. गौरव चौबल, संदीप पाटेकर आदी उपस्थित होते. डॉ. विवेक तळावलीकर म्हणाले, यकृताचा आजार हा भारतातील वाढत्या चिंतेचा विषय आहे, 10 टक्के लोकसंख्या यकृताच्या कोणत्या ना कोणत्या आजाराने बाधित असते. यकृत रोगाचा प्रादुर्भाव विशेषत: उच्च हिपॅटायटीस बी आणि सी संक्रमण, मद्यपानाचा अतिरेक, एनएएसएच हा नॉन-अल्कोहोलिक पॅटी लिव्हर डिसीज, बैठी जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळेही मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. यकृताच्या वाढत्या आजाराला तोंड देण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटलतर्फे सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या कित्येक वर्षांपासून पश्चिम भारतात अवयव प्रत्यारोपणात ग्लोबल हॉस्पिटल अग्रेसर आहे. 2022 मध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या टीमने 126 यकृत, स्वादुपिंड आणि आतडे प्रत्यारोपण केले आहेत. ज्यामध्ये प्रौढ आणि बालऊग्णांचा जगण्याचा दर 95 टक्के इतका आहे. मुख्य शल्यचिकित्सक डॉ. गौरव चौबळ हे गेल्या 15 महिन्यांपासून गोव्यात मासिक ओपीडी करत आहेत आणि परिसरातील ऊग्णांना सेवा पुरवित आहेत.
गोव्यात वर्षभरात चार यकृत प्रत्त्यारोपणे
गेल्या वर्षभरात 100 टक्के यशस्वी परिणामांसह गोवा राज्यातील रूग्णांवर चार 4 जिवंत दात्याचे प्रत्यारोपण आणि सुमारे 12 हेपॅटो-पॅनक्रियाटिक-बिलीरी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आमच्या सर्जनच्या उच्च श्रेणीच्या सेवा आणि वैद्यकीय कौशल्य गोव्यातील लोकांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे, असे डॉ. विवेक तळावलीकर म्हणाले.
गोव्यातील चार दात्यांचा सन्मान
देशात वर्षाला 25 ते 30 हजारजण यकृताच्या आजारामुळे दगावतात. अशा ऊग्णांवर वेळीच उपचार होणे गरजेचे असते. यकृतासंबंधीचा आजार निष्काळजीपणामुळे बळावत गेल्यास त्याचा परिणाम गंभीर ठरतो. त्यामुळेच गोव्यातही यकृत प्रत्यारोपण सेवा देण्यात येणार आहे. यावेळी राज्यातील 4 दात्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.









