स्पेनमधील एका 50 वर्षे वयाच्या धावपटू महिलेने तेथील प्रसिद्ध गुहेत 500 दिवस वास्तव्य करण्याचा विक्रम नुकताच पूर्ण केला आहे. तिचे नाव बिएट्रिज फ्लॅमिनी असे आहे. या विक्रमामुळे तिचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये समाविष्ट करण्यात आले. ती ग्रेनाडा शहरानजीकच्या या गुहेत जमीनीखाली 230 फूट इतक्या अंतरावर राहिली होती. या सर्व 500 दिवसांमध्ये तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क जवळपास नव्हताच, असे सांगण्यात आले.

विक्रम करुन बाहेर आल्यानंतर तिने एक पत्रकार परिषद घेऊन आपले अनुभव कथन केले. 500 दिवसांनंतर तिला गुहेतून बाहेर काढण्यासाठी एक दल पाठविण्यात आले होते. त्यावेळी ती झोपली होती. आपण या गुहेत 500 दिवस घालविले आहेत आणि आपले उद्दिष्टय़ पूर्ण झाले आहे, याची तिला जाणीवही नव्हती. अजूनही काही दिवस आपल्याला येथे रहावे लागेल असेच तिला वाटले.
500 दिवसांच्या या वास्तव्यात तिने बहुतेक वेळ वाचनात घालविला. एकंदर 60 पुस्तके तिने वाचून काढली. याशिवाय तिने अनेक पेंटिंग्ज काढली आणि भरपूर विणकामही केले. या वास्तव्यात ती प्रतिदिन 2 लीटर पाणी पीत होती. अशा प्रकारे तिला एकंदर 1 हजार लीटर पाणी लागले. प्रारंभी ती प्रत्येक दिवस मोजत राहिली होती. पण नंतर सवय झाल्यानंतर तिने दिवस मोजणेही बंद केले. आता हा विक्रम पूर्ण केल्यानंतर ती अन्य प्रकल्प हाती घेण्यापूर्वी तिच्या डॉक्टरांकडे जाणार आहे. 500 दिवस निर्मनुष्य स्थानी एकांतात घालविल्यामुळे आपल्या शरीरावर आणि मनावर कोणता परिणाम झाला आहे, याचा शोध ती डॉक्टरांच्या साहाय्याने घेणार आहे. सर्वकाही ठाकठीक असल्यास ती नवे प्रकल्प हाती घेणार आहे. तिच्या या वास्तव्यात मानसोपचार तज्ञ, संशोधक, प्रशिक्षक आणि अभ्यासक यांचे एक दल तिच्यावर लक्ष ठेवून होते. मात्र, त्यांच्याशी तिचे थेट बोलणे होत नव्हते. तसेच तिला भेटण्यास अन्य लोकांनाही अनुमती नव्हती. एकंदर, एकांतातील हा अनुभव विस्मयकारक होता, असे प्रतिपादन तिने केले.









