मुलींच्या हत्येविरोधात हजारो लोक रस्त्यावर
वृत्तसंस्था/ ब्यूनस आयर्स
अर्जेंटिनामध्ये अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका टोळक्याने तीन मुलींची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली असली तरी आता ही संपूर्ण घटना इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीम केल्यानंतर खळबळ उडाली आहे. हजारो लोकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवत संबंधितांना अटक करून कडक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे. टोळक्यातील तरुणांनी प्रथम मुलींना बेदम मारहाण केली, त्यांची बोटे कापली, नखे उपटली आणि शेवटी त्यांचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. संशयितांपैकी एकाला बोलिव्हियाच्या सीमावर्ती शहरात व्हिलाझोनमधून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर कारद्वारे लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी कटाच्या सूत्रधाराचा फोटो देखील जारी केला आहे. तो 20 वर्षांचा आणि पेरुव्हियन नागरिक असून तो अजूनही फरार आहे.
मुलींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रविवारी हजारो लोकांनी रस्त्यावर उतरत न्यायाची मागणी केली. पीडितांच्या कुटुंबियांनी ‘लारा, ब्रेंडा, मोरेना’ असे लिहिलेले बॅनर आणि त्यांचे फोटो असलेले पोस्टर घेऊन संसदेकडे कूच केली. मुलींची सुरक्षा आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाची असल्याचे ब्रेंडाचे वडील लिओनेल डेल कॅस्टिलो यांनी म्हटले आहे.









