कोल्हापूर / इंद्रजित गडकरी :
शहरातील तरुणाईत आधुनिकतेच्या नावाखाली वाढत चाललेल्या लिव्ह–इन रिलेशनशिपचा काळा अध्याय पुन्हा एकदा समोर आला आहे. मंगळवारी शहरातील समीक्षा नरसिंगे या 23 वर्षीय तरुणीचा खून तिच्या प्रियकराने केल्याची धक्कादायक घटना घडली. हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत होते. पंधरा दिवसांपूर्वीच आर. के नगर येथील तरुणाने अशाच स्वरूपात आत्महत्या केली होती. यामुळे कोल्हापूरसारख्या शांत शहरातही मुंबई–पुण्यासारखे प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.
ही घटना केवळ गुन्हेगारी बाब न राहता सामाजिक दृष्टिकोनातूनही विचार करण्यास भाग पाडणारी आहे. समीक्षा आणि तिचा प्रियकर लिव्ह–इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पहिल्यांदा हे नातं प्रेमाने सुरु झालं, मात्र नंतर त्यात रोजचे भांडण, संशय आणि मानसिक त्रास सुरू झाला. अखेरीस तीव्र वादातून या तरुणीचा जीव गमवावा लागला.
- लिव्ह–इन: आकर्षण की अज्ञानातून उडी?
लिव्ह–इन रिलेशनशिप ही संकल्पना मुख्यत: स्वातंत्र्य, जबाबदारीची विभागणी आणि लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी उपयुक्त मानली जाते. मात्र भारतात, विशेषत: लहान शहरांमध्ये, सामाजिक मूल्यं, संस्कार, कुटुंबसंस्था यामधील विसंवादामुळे अशा नात्यांमध्ये अडचणी वाढतात. युवक–युवतींना स्वातंत्र्य हवे असते, पण त्यामागची जबाबदारीची जाणीव असतेच असे नाही. त्यातून गैरसमज, हिंसा आणि भावनिक त्रास वाढू शकतो.
- घरच्यांचा सहभाग कमी, संवादाचा अभाव
आज अनेक तरुण–तरुणी आपल्या नात्यांविषयी आई–वडिलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्यातून ते कोणासोबत राहतात, काय अडचणी आहेत हे घरच्यांना समजतही नाही. विशेषत: मुली अशा नात्यांमध्ये सुरक्षित आहेत का, याकडे दुर्लक्ष केले जाते. घरच्यांनी मुलांवर विश्वास ठेवून, संवाद वाढवणे ही काळाची गरज आहे.
- तरुण तरुणींनी विचारपूर्वक पाऊले टाकावीत
तरुण–तरुणींनी नात्यांमध्ये उतरण्यापूर्वी स्वत:ची मानसिक, सामाजिक आणि आर्थिक तयारी करणे अत्यावश्यक आहे. नात्यांमधील पारदर्शकता, विश्वास, संवाद आणि मर्यादा यांचे भान ठेवले गेले पाहिजे. फक्त आकर्षणाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराच्या वेदनांचे कारण ठरू शकतात. अशा रिलेशनमध्ये राहत असताना घरच्यांचा विचारही विशेषत: तरूंणीनी करणे गरजेचे आहे.
- पालकांची भूमिका महत्वाची
आई–वडिलांनी आपल्या मुलांशी नुसते नियम लावण्यापेक्षा संवाद वाढवावा. त्यांचे मित्र, नाती यांच्याबद्दल जाणून घ्यावे. कटु अनुभवांमुळे आपल्या मुलांचे आयुष्य धोक्यात जाऊ नये यासाठी घरच्यांनी प्रेम, विश्वास आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा समतोल साधावा.
- समाजाची जबाबदारी
कोणतेही नातं लग्नाचे असो की लिव्ह–इन त्यामागे परिपक्वता आणि जबाबदारी आवश्यक असते. समाजानेही अशा नात्यांबाबत खुलेपणाने चर्चा करणे, शिक्षण आणि मार्गदर्शन पुरवणे गरजेचे आहे.
- जोखीम ओळखणे गरजेचे
लिव्ह–इन रिलेशनशिप ही काळानुरूप विकसित झालेली संकल्पना असली तरी ती ‘मोकळं प्रेम‘ एवढ्यावर मर्यादित नाही. ती समजून घेणे, तिच्यात असलेली जोखीम ओळखणे आणि त्यासोबतच स्वत:ला तयार करणे हे तरुणांनी शिकले पाहिजे. आई–वडिलांनीही मुलांशी खुल्या मनाने संवाद साधला पाहिजे.








