बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित सराफ शिल्ड 15 वर्षांखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी लिटल स्कॉलर संघाने संजय घोडावत संघाचा 10 गड्यांनी तर केएलई इंटरनॅशनल डॉफीडेड स्कूल कुडची संघाचा 193 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. प्रितम मलगौडा व कलश बेनकट्टी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते विजय सराफ, अभय सराफ, अथर्व सराफ, आनंद सराफ, सराफ सोलापुरकर, रामकृष्ण एन., विनय नाईक, बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील आदीं मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन झाले. पहिल्या सामन्यात संजय घोडावत संघाने प्रथम फलंदाजी करताना 19 षटकात सर्वगडी बाद 49 धावा केल्या.
त्यात एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. लिटल स्कॉलरतर्फे प्रितम व बसवराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लिटस् स्कॉलरने 3.4 षटकात बिनबाद 53 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात अमोघने नाबाद 7 चौकारांसह 30 तर प्रितमने नाबाद 10 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 गडी बाद 234 धावा केल्या. त्यात आदित्य एच.ने 10 चौकारांसह 76, कलश बेनकट्टीने 7 चौकारांसह 42, कौस्तुभ पाटीलने 3 चौकारांसह 27 तर युग शहाने 25 धावा केल्या. कुडचीतर्फे जहर, ओवेज व आरीफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना डॉफीडेड स्कूल कुडचीचा डाव 14.4 षटकात 41 धावांत आटोपला. त्यात एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. केएलईतर्फे युग शहाने 5 धावांत 3 तर कलश बेनकट्टी व कौस्तुभ पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









