कूर :
तिचं वय अवघं पंधरा महिने. जोडीला देवानं बहाल केलेलं सदैव हसऱ्या मुखाचे सुंदर गोंडस् रुप. नुकतंच जमीनवरचं रांगण पार करुन ‘ती’ घरात दुडूदुडू धावू लागली होती. सुखावून टाकणारे तिचे बोबडे बोल सर्वांनाच भावायचे. त्यामुळे ती सर्वांची आवडती ‘मयू’ झाली होती. नुकताच तिचा पहिला वाढदिवस तिच्या आई–बाबांनी अख्ख्या गावाला व पै–पाहुण्यांना आमंत्रित करुन हौसेनं मोठ्याने साजरा केला होता. पण, मृत्यूने चोरपावलांनी येऊन तिला अखेर गाठलचं अन् झोपेतच ह्दयविकाराच्या झटक्याने तिचे निधन झाले. या चिमुकलीचे नाव आहे मायरा विजय पाटील (नाधवडे, ता. भुदरगड).
लोककलाकार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस व तालुक्याचे अध्यक्ष असलेल्या जयसिंग पाटील यांचे कुटूंब म्हणजे मायराचे गोकुळच. त्यांच्या दोन्ही मुलांची लग्नं झालेली. थोरल्या दिगंबरला मैथिली व रणवीर ही चार व सहा वर्षांची लेकरं तर धाकट्या विजयच्या संसार वेलीवर पंधरा महिन्यापूर्वी ‘मायरा’ नावाची कळी उमलली होती. जन्मताच ती खूपच गोंडस व देखणी.
त्यामुळे ती सर्वांचीच लाडकी झाली होती. अलीकडे ती दारात उभं राहून येणाऱ्या–जाणाऱ्या प्रत्येकाला आई–बाबा, नाना, काकी अशा बोबड्या बोलानं हाका मारायची.
गेल्या 28 डिसेंबरला तिच्या आई–बाबांनी आपल्या लेकीचा पहिला वाढदिवस मोठ्याने साजरा केला होता. दारी फुलांनी सजवलेला मंडप उभारुन पै–पाहुणे व अख्ख्या गावाला भोजनाचे आमंत्रण दिले होते, पण गेल्या मंगळवारचा दिवस या कुटूंबासाठी मोठं दु:ख घेऊन आला. मायराला दूध–भात चारवून तिची आई आरती हिने तिला झोपवले आणि त्यांचे डोकं गरगरु लागल्याने व उलट्या होऊ लागल्याने चुलत सासऱ्या सोबत उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेल्या, पण इकडे बराच वेळ झाला मायरा झोपेतून जागी झाली नाही म्हणून आजीने तिला उठविण्याचा प्रयत्न केला पण ती निपचित पडली होती. तिच्या शरिराची कोणतीच हालचाल होत नव्हती. तिला तत्काळ बालरोग तज्ञाकडे नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
मायराच्या मृत्यूचे समजताच तिच्या आई–बाबांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचा ह्दय पिळवटून टाकत होता तर पाटील कुटुंबीयांवर ओढविलेल्या दु:खद प्रसंग व चिमुकल्या मायराच्या निधनाने संपूर्ण गावावर सर्वत्र शोकळळा पसरली आहे.
- एकाच रुग्णालयात माय- लेक तरी….
तिच्या आईला ज्या दवाखान्यात नेले होते आणि उपचार सुरु होते. तिथेच लेकीला नेले, पण माय–लेकीची शेवटची भेट देखील होऊ शकली नाही. विशेष म्हणजे आपली एकुलती लेक या जगाचा निरोप घेऊन गेली आहे. याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. तर दुसरीकडे गेले चार दिवस मायराचे आजोबा ह्दयाशी संबंधित रुग्णालयात कोल्हापुरात उपचार घेत आहेत. ते अतिदक्षता विभागात असल्याने नातीच्या दु:खद निधनाची बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. आपली लाडकी नात सोडून कायमची गेल्याची थोडीशी कल्पनाही त्यांना अद्याप नाही.








