बांगलादेशच्या 9 बाद 484 धावा, फर्नांडो, टी.रत्नायकेचेही प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ गॅले, लंका
यजमान लंकेविरुद्ध येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने पहिल्या डावात 9 बाद 484 धावा जमविल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो व मुश्फिकुर रहीम यांनी शतके नोंदवली तर लिटन दासने 90 धावांचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने काही काळ खेळ थांबला होता.
मंगळवारी पहिल्या दिवशी बांगलादेशने प्रथम फलंदाजी स्वीकारत 3 बाद 292 धावा जमविल्या होत्या. त्यावेळी शांतो 136 व रहीम 105 धावांवर खेळत होते. या धावसंख्येवरून बांगलादेशने दुसऱ्या दिवसाच्या खेळास प्रारंभ केला आणि या नाबाद जोडीने चौथ्या गड्यासाठी 264 धावांची भागीदारी केली. फर्नांडोने शांतोला बाद करीत ही जोडी फोडली. त्याने 279 चेंडूत 15 चौकार, एक षटकारासह 148 धावा जमविल्या. नंतर रहीमला लिटन दासने चांगली साथ दिली आणि या जोडीने सहाव्या गड्यासाठी 149 धावांची भागीदारी करीत बांगलादेशची स्थिती आणखी मजबूत केली. फर्नांडोनेच रहीमला बाद करीत ही जोडी फोडली. त्याने 350 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 163 धावा जमविल्या.
यानंतर मात्र बांगलादेशचे गडी लवकर बाद होत गेले. रहीम बाद झाल्यावर पुढच्याच षटकात दासही बाद झाला. त्याने 11 चौकार, 1 षटकारासह 90 धावा जमविल्या. जाकेर अली, तैजुल इस्लाम, नईम हसन झटपट बाद झाले. दिवसअखेर बांगलादेशने 151 षटकांत 9 बाद 484 धावा जमविल्या होत्या. असिता फर्नांडो, मिलन रत्नायके, थरिंदू रत्नायके यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश प.डाव 151 षटकांत 9 बाद 484 : नजमुल हुसेन शांतो 148, मुश्फिकुर रहीम 163, लिटन दास 90, मोमिनुल हक 29, अवांतर 15. असिथा फर्नांडो 3-80, मिलन रत्नायके 3-38, थरिंदू रत्नायके 3-196.









