वृत्तसंस्था/ ढाका
लिटॉन दास आणि मुश्फिकुर रहीम यांच्या दमदार नाबाद शतकामुळे बांगलादेशचा पहिला डाव सावरला. उपाहारावेळी त्यांची स्थिती 5 बाद 66 अशी केविलवाणी झाली होती. पण त्यानंतर दास आणि रहीम यांनी नाबाद शतके झळकवित सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 253 धावांची भागिदारी केली. बांगलादेशने दिवसअखेर पहिल्या डावात 85 षटकांत 5 बाद 277 धावा जमविल्या. लंकेच्या रजिताने 3 तर असिता फर्नांडोने 2 गडी बाद केले.
या दुसऱया कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. डावातील पहिल्याच षटकांत रजिताने दुसऱया चेंडूवर सलामीच्या मेहमुदुल हसनचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. त्यानंतर असिता फर्नांडोने तमीम इक्बालला खाते उघडण्यापूर्वी जयविक्रमाकरवी झेलबाद पेले. रजिताने डावातील पाचव्या षटकांत चौथ्या चेंडूवर नजमुल हुसेनला 8 धावांवर त्रिफळाचीत केल्यानंतर असिता फर्नांडोने कर्णधार मोमिनुल हकला 8 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर रजिताने बांगलादेशला आणखी एक धक्का देताना याच षटकांतील पाचव्या चेंडूवर शकीब अल हसनला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. बांगलादेशची यावेळी स्थिती 6.5 षटकांत 5 बाद 24 अशी नाजूक होती.
मुश्फिकुर रहीम आणि लिटॉन दास या जोडीने बांगलादेशचा डाव चांगलाच सावरला. या जोडीने सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 253 धावांची भागिदारी केली. रहीम 252 चेंडूत 13 चौकारांसह 115 तर लिटॉन दास 221 चेंडूत 1 षटकार आणि 16 चौकारांसह 135 धावांवर खेळत आहे. लंकेतर्फे रजिताने 43 धावांत 3 तर असिता फर्नांडोने 80 धावांत 2 गडी बाद केले.
कुशल मेंडीस कसोटीतून बाहेर
लंकेचा फलंदाज कुशल मेंडीस याला अचानक छातीमध्ये वेदना जाणवू लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. सोमवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱया कसोटीसाठी त्याची संघात निवड करण्यात आली होती. बांगलादेशच्या पहिल्या डावातील 23 वे षटक सुरू असताना कुशलला छातीमध्ये तीव्र वेदना होवू लागल्याने तो मैदानात कोसळला. त्यानंतर त्याला त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसापूर्वी कुशलला उलटी आणि जुलाब वारंवार झाल्याने त्याला अशक्तपणा जाणवत होता. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता तो दुसऱया कसोटीत खेळू शकणार नाही. या मालिकेतील पहिल्या कसोटीत कुशल मेंडीसने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱया डावात 48 धावा जमविल्याने लंकेला ही कसोटी अनिर्णित राखता आली होती.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश प. डाव-85 षटकांत 5 बाद 277 (मुश्फिकुर रहीम खेळत आहे 115, लिटॉन दास खेळत 135, नईमुल हुसेन 8, मोमिनुल हक 9, रजिता 3-43, असिता फर्नांडो 2-80).









