प्रा. अशोक अलगोंडी यांचे प्रतिपादन : मच्छे येथे छत्रपती शाहू महाराज साहित्य संमेलन उत्साहात
वार्ताहर/किणये
सध्याची तरुणपिढी मोबाईल, इंटरनेट यांच्याशी अधिक जवळीक साधू लागली आहे. त्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. नियमित वाचनामुळे साहित्यिक घडू शकतात. वाचनातूनच साहित्याची निर्मिती होते, असे प्रतिपादन कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाचे प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले. राज्य मराठी विकास संस्था मुंबई व छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या पटांगणात छत्रपती शाहू महाराज साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने अलगोंडी बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील होते. पॉलिहैड्रॉन साहित्यनगरी या शामियान्याचे उद्घाटन हायलॉक कंपनीचे मालक दिलीप चिटणीस यांनी केले. प्रास्ताविक सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी केले. मराठी भाषा आणि चळवळ याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली. मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी स्वागत केले.
ग्रंथदिंडी ठरली लक्षवेधी
प्रारंभी मच्छे येथील लक्ष्मी मंदिरापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडीचे उद्घाटन पॉलिहैड्रॉन कंपनीचे मालक सिद्धार्थ हुंदरे यांनी केले. ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल, शेतकरी, म. गांधीजी आदींच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. मुलींनी ग्रंथदिंडीसाठी पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या साड्या परिधान केल्या होत्या. यामुळे ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. टाळ-मृदंगाचा गजर वारकरी करीत होते. ग्रंथदिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. महादेव मंगणाकर, सुवर्णा लोहार, भोमाणी बिर्जे, संतोष जैनोजी, कृष्णा अनगोळकर, सागर कणबरकर, पी. सी. गोरल आदींच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन केले. डॉ. दीपक देसाई, सह्याद्री सोसायटीचे चेअरमन एन. बी. खांडेकर, माजी प्राचार्य आर. के. पाटील, माजी प्राचार्य एम. बी. निर्मळकर, माजी प्राचार्य ए. एस. देसाई, प्रा. सुरेश पाटील आदींनी दीपप्रज्वलन केले. मराठी भाषेबद्दल सर्वांना अभिमान असायला पाहिजे. या भाषेसंदर्भात समाजात अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे, असे अॅड. राजाभाऊ पाटील यांनी सांगितले. यावेळी पी. पी. बेळगावकर यांनीही विचार मांडले.
कवी संमेलनात नवोदित कवींना प्राधान्य
दुसऱ्या सत्रात कवी संमेलन झाले. यामध्ये शिवाजी शिंदे अध्यक्षस्थानी होते. कवी संमेलनात विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित कवींना प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांनीही स्वरचित विविध कविता सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कथाकथन झाले. अध्यक्षस्थानी किणये येथील सुवर्णा पाटील होत्या. या सत्रात कथाकथनच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम
चौथ्या सत्रात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. द. म. शिक्षण मंडळाच्या विविध हायस्कूलमधील शिक्षक, विद्यार्थी संमेलनात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अजित नाकाडी, पी. एम. पाटील, सोनाली एन. पाटील व प्रगती एम. चौगुले आदींनी केले. संमेलनासाठी शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
‘आरंभ’ पुस्तिकेचे प्रकाशन
व्ही. एस. पाटील हायस्कूलतर्फे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी काव्यसंग्रह, कथासंग्रह, चित्रकला, लेखनाचे संकलन करून हस्तलिखित पुस्तिका तयार केली. या पुस्तिकेचे ‘आरंभ’ असे नामकरण करण्यात आले. या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले.









