मान्यवरांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश : ग्रंथदिंडी, व्याख्यान, कवी संमेलनासह साहित्याची मेजवानी
प्रतिनिधी /खानापूर
श्री सुब्रमण्य साहित्य अकादमी माचीगड-अनगडी (ता. खानापूर) यांच्यावतीने होणारे 26 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 1 जानेवारीला भरविण्याचा निर्णय अकादमीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष बाबुराव पाटील होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. माचीगड अनगडीचे हे संमेलन दरवषी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित केले जाते. पण यावषी शेवटच्या रविवारी नाताळ सण आला आहे. यासाठी जानेवारी 1 रोजी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘प्रगल्भा’ विशेषांकाचे प्रकाशन
आतापर्यंत 25 वर्षांचा विशेष आढावा घेणारा ‘प्रगल्भा’ हा सुंदर असा विशेषांक प्रकाशित होणार असून आजतागायत या संमेलनात ज्या नामवंत साहित्यिकांनी अध्यक्ष म्हणून आपले पद भूषविलेले आहे. त्यांचे लेख यामध्ये असणार आहेत.
सदर संमेलन एकूण चार सत्रात होणार असून त्यामध्ये ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, संमेलनाध्यक्षाचे भाषण व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचा त्यामध्ये समावेश आहे. यावेळी मान्यवर साहित्यिकाबरोबरच अनेक दिग्गजांची उपस्थिती राहणार आहे. त्यांचा थोडक्यात परिचय.
संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल मोहन सबनीस

ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक पुणे, अखिल भारतीय 89 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, जन्मस्थान हैद्राबाद. मुक्ती संग्रामाची क्रांतीभूमी हाडोळी ता. निलंगा मराठवाडा, क्रांतिवीर मोहनराव पाटील (सबनीस) यांच्या शेतकरी कुटुंबात जन्म. कुलगुरु पदासाठी 2004 व 2006 मध्ये निवड. राजभवनावर मुलाखत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील तौलानिक भाषा विभागप्रमुख आणि प्राध्यापक म्हणून सेवा बजाविली. तसेच कला शाखेचे डिन म्हणून कार्यरत होते. प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त. वैचारिक ग्रंथसंपदाची निर्मिती. विविध 60 ग्रंथांची निर्मिती. आजपर्यंत वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित. तीन एकांकिकाचे लेखन, 192 पुस्तकांना प्रस्तावना, विविध विषयांवर 800 वर लेख प्रकाशित.
दुसरे सत्र राजेंद्र केरकर-गोवा

म्हादई मलप्रभा खोऱ्यातील भक्ती परंपरा या विषयावर केरकर यांचे व्याख्यान होणार आहे. राजेंद्र केरकर हे पर्यावरणप्रेमी, इतिहास आणि लोकसाहित्याचे संशोधक तसेच विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय असणारे कार्यकर्ते. पर्यावरणाचे जतन, संवर्धन हेच त्यांनी आपल्या आयुष्याचे आद्यकर्तव्य मानले आहे. म्हादई जलविवाद, सत्तरीतील खडीकरण समस्या, म्हादई अभयारण्यातील पट्टेरी वाघाचे अस्तित्व यासह म्हादई, भांडुरा, कळसा प्रकल्पाबाबत वास्तविक व अभ्यासपूर्ण लेखन करून लोकांमध्ये जागृती निर्माण केली आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांतून पर्यावरण रक्षणासाठी पथनाट्या व्याख्यान. लोकसाहित्य आणि इतिहास या विषयाचे संशोधनाशी निगडित अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही लेख प्रसिद्ध झालेले आहेत.
तिसऱ्या सत्रात कवी संमेलन
यामध्ये ‘कवितेच्या जाऊ गावा’ यामध्ये प्रा. अशोक आलगोंडी अध्यक्ष शब्दगंध मंडळ, भरत गावडे पारवाड, सुधाकर गावडे पारवाड, कृष्णा पारवाडकर पारवाड हे कवि आपल्या कविता सादर करणार आहेत.
चौथे सत्र – जादूगार प्रेमानंद पाटील

प्रेमानंद पाटील यांचे मूळगाव तालुक्यातील कसबा नंदगड असून सध्या त्यांचे वास्तव्य गोवा येथे आहे. ते उत्कृष्ट कब•ाrपट्टू म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी जादूच्या प्रयोगाद्वारे देश, विदेशात अनेक जादूचे प्रयोग सादर केलेले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी तालुक्यातील प्रकाश चव्हाण, आमदार अंजली निंबाळकर, माजी आमदार दिगंबर पाटील, मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन, कवितासंग्रहाचे प्रकाशन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते तर प्रगल्भा विशेषांकांचे प्रकाशन अतुल दांगट दत्त दिगंबर डेव्हलपर्स पुणे व डॉ. सोनाली सरनोबत अध्यक्षा नियती फाऊंडेशन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी पीटर डिसोजा वास्तू विशारद पुणे, बाबुराव एन. पाटील, हेमलता वाय. कोलकार यांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथदिंडीचे उद्घाटन संभाजीराव देसाई, मारुती महाराज नंदगड यांच्या हस्ते होणार आहे. सुब्रम्हण्यम देवता पूजन भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन, उदयसिंगराव सरदेसाई साहित्य नगरीचे उद्घाटन समितीचे कार्यकर्ते निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते होणार आहे. तर रामचंद्र शिंदे प्रवेशद्वाराचे उद्घाटन पीएलडी बँक चेअरमन मुरलीधर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कै. नागनाथ कोत्तापल्ली सभागृहाचे उद्घाटन
अॅड. आय. आर. घाडी यांच्या हस्ते होणार आहे. सुब्रम्हण्य व्यासपीठाचे उद्घाटन नारायण कापोलकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, लक्ष्मण काकतकर, रामचंद्र निलजकर, दत्ता भेकणे, शंकर गुरव, डॉ. रफिक हलशीकर, नारायण पाटील, विकासराव देसाई, एम. बी. मुरगोड, पांडुरंग कदम, गोविंद भेकणे आदी उपस्थित राहणार आहेत.









