पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित
आचरा प्रतिनिधी
गेली 26 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकसेवा समिती डोंबिवली या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा २०२४ सालचा लोकसेवा पुरस्कार ,साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबवली येथे प्रदान करण्यात आला. सुरेश ठाकूर यांना मानपत्र, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि 5 हजार रुपयांचा धनादेश समारंभपूर्वक देण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अनिल रंगनाथ परब आणि अस्मिता आत्माराम नाटेकर यांना देदेवून गौरविण्यात आले. या कार्यकम प्रसंगी अध्यक्ष रामचंद्र परब, उपाध्यक्ष विवेकानंद बागवे, सचिव विजय साईल, आत्माराम नाटेकर, रामचंद्र आंगणे उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना सुरेश ठाकूर म्हणाले की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. महाराष्ट्रभर माझे अनेक सत्कार झाले. पण, आमच्या पालकमंत्र्यांच्या डोंबिवलीत प्रचंड जनसागरासमोर होत असलेला हा माझा मोठा सन्मान आहे. लोकसेवा समितीच्या सामाजिक -सांस्कृतिक कार्याने मी भारावून गेलो आहे. लोकसेवा समितीचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. आपणास मिळालेला हा पुरस्कार मी साने गुरुजी कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांना समर्पित करत असल्याचे यावेळी ठाकूर म्हणाले.









