डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे वझरी येथे प्रतिपादन
फोंडा : साहित्य हा मनाचा प्रवास असतो. त्यामुळे हा प्रवास कितीही खडतर असला तरी त्याची तिव्रता खऱ्या साहित्यिकाला जाणवत नाही. कारण साहित्य निर्मितीमधील आनंद हा अवर्णनीय आहे. या प्रवासात भेटणारे मार्गदर्शन आणि जाणकार यांच्यामुळे साहित्यातील भ्रमण सुकर होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिक प्रा. सोमनाथ कोमरपंत यांनी केले. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने वझरी पेडणे येथे आयोजित केलेल्या दोन दिवशीय निवासी बहुभाषिक साहित्यिकांच्या मेळाव्यातील प्रकट मुलाखतीच्या सत्रात ते बोलत होते. मुलाखतकार राजू भिकारो नाईक आणि कथाकार प्रा. नारायण महाले यांनी डॉ. कोमरपंत यांची मुलाखत घेतली.
प्रज्ञावंतांचा लाभला सहवास
साहित्याच्या प्रवासात आपल्याला गोमंतकीय प्रतिभावंत कवी बा. भ. बोरकर, प्रल्हाद वडेर, गं. ब. ग्रामोपाध्ये या सारख्या विचारवंतांनी प्रोत्साहित केल्यामुळे आपल्या अक्षर विश्वाला योग्य दिशा मिळाली, असे सांगून साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा लेखकांचा आणि कवी, कवयित्रींचा विशेष उल्लेखही डॉ. कोमरपंत यांनी यावेळी केला.
गोमंतकीय साहित्याला समृद्ध परंपरा
आपल्या साहित्य संपदेमध्ये साहित्dयातील लघु आणि प्रबंध लेखनाचा समावेश असून काव्य, कथा, ललित, कादंबरी हे सगळे साहित्य प्रकार आपल्याला भावतात. त्यामुळे साहित्यिक हा अक्षरांच्या मर्यादेत जगू शकत नाही. परिस्थितीनुसार साहित्य निर्मितीच्या कार्यात तो स्वत:ला झोकून देत असल्याचे मत डॉ. कोमरपंत यांनी व्यक्त केले. गोमंतकीय साहित्याला चांगला दर्जा असून गोमंतकीय साहित्य सृष्टी समृद्ध असल्याचे सांगताना त्यांनी येथील साहित्य परंपरेचा मागोवा घेतला. उच्च पर्यावरण आणि प्रसन्न निसर्ग हा साहित्यिकांसाठी प्रेरणादायी असतो. परंतू निसर्गावरील अत्याचार, कॅसिनो संस्कृती असे कितीतरी विषय साहित्यिकांच्या मानसिक खच्चिकरणास कारणीभूत ठरतात. निसर्गाचा ऱ्हास हा समाजजीवनासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. कोमरपंत यांच्या समग्र साहित्यावर आधारलेले काही प्रश्न राजू भिकारो नाईक यांनी त्यांना मार्मिक तसेच रंजक पद्धतीने विचारले. प्रा. नारायण महाले यांनी त्यांच्या साहित्य विषयक कार्याची माहिती दिली. इन्स्टिट्यूट मिनेझि ब्रागांझाचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.









