20 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येळ्ळूर येथे दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती : पाच सत्रांमध्ये संमेलन
वार्ताहर/येळ्ळूर
20 व्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने येळ्ळूर येथे रविवारी अनेक दिग्गज साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे. पाच सत्रामध्ये चालणाऱ्या संमेलनाचे पहिले सत्र हे उद्घाटन व जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालय दिल्लीचे प्राध्यापक व साहित्यिक डॉ. शरद बाविस्कर यांच्या अध्यक्षीय भाषणाचे असणार आहे. तर दुसऱ्या सत्रात पुण्याचे साहित्यक दत्ता देसाई हे आपली संस्कृती, आपला विकास यावर विचार मांडणार आहेत. तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरणाबरोबर लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे यांचा ‘एक तास बसा मनसोक्त हसा’ हा विनोदी कार्यक्रम होणार आहे. चौथ्या सत्रात अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या मुलाखतीचे असून पाचव्या सत्रात जागर लोककलेचा हे जुगलबंदी भारुड संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत.
संमेलनाध्यक्ष-डॉ. शरद बाविस्कार
संमेलनाध्यक्ष डॉ. शरद बाविस्कार हे धुळे जिल्ह्यातील रावेर येथील शेतकरी कुटुंबातील असून संघार्षातून वर आलेले व्यक्तिमत्त्व आहे. दहावी नापास झाल्यानंतरही जिद्दीने सात भाषांवर प्रभूत्व मिळवत पाच मास्टर्स डिग्री प्राप्त केल्या आहेत. शिवाय त्यांनी फ्रेंच तत्त्वज्ञान विषयात पीएचडी केली आहे. सद्या ते (जेएनयु) दिल्ली येथे फ्रेंच आणि फ्रॅकीफीन स्टडीजचे प्राध्यापक आहेत. त्यांचे आत्मकथन ‘भुरा’ मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. जिद्दीच्या जोरावर त्यांनी युरोपातील तीन देशात उच्च शिक्षण घेतले आहे.
दत्तात्रय कृष्णा देसाई
दत्तात्रय कृष्णा देसाई हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनविज्ञान चळवळीचे कार्यरत सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते समाज विज्ञान अकादमी,पुणेचे विश्वस्त असून विज्ञान आणि शिक्षणाच्या प्रचार आणि प्रचारासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रशिक्षण, शिबिरे, समाजजागृती मोहिमा राबवत असतात. ते लेखक संपादक आणि वक्ते असून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक विषयांवरील पुस्तके, लेख आणि ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांना विविध सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांची जन्मभूमी जरी बेळगाव असली तरी कर्मभूमी पुणे आहे.
लोकशाहीर-प्रा. रणजित कांबळे ,एसएसडब्ल्यु शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर पीएचडी
वयाच्या सातव्या वर्षी कलाक्षेत्रात प्रवेश करून ते वक्ता, निवेदक व्याख्याते, गायक व शाहिरी अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. गीत राधाई आणि गाथा महाराष्ट्राची या कार्यक्रमाच्या माध्यमातून 200 हून अधिक कार्यक्रमांचे संचालन केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक या पदावर, पालघर, नंदुरबार, रायगड येथे ग्राम विकासाची चार वर्षे सेवा बजावली आहे. भीमवाद विद्रोही शाहिरी जलसा व नवमहाराष्ट्र लोकशाहीर जलसा स्थापना करून 300 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. तर ‘एक तास बसा मनसोक्त हसा’ कार्यक्रम सद्या गाजतो आहे.
वंदना गुप्ते-दिग्गज अभिनेत्री
वंदना गुप्ते या मराठी रंगभूमी चित्रपट आणि दुरचित्रवाणी विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री असून वाडा चिरेबंदी, चारचौघी, सुंदर मी होणार, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकातून त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. आंधळी कोशिंबीर, टाईम प्लीज, पछाडलेला, लपंडावसारख्या चित्रपटात त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, त्याचबरोबर झी नाट्यागौरव व गोगटे फौंडेशन जीवन गौरवने सन्मानित केले आहे.
संदीप मोहिते-आबा चव्हाण
संदीप मोहिते व आबा चव्हाण यांचा जुगलबंदी कार्यक्रम समाजप्रबोधनासाठी प्रसिद्ध असून व्यसनमुक्ती, पर्यावरण, स्त्रीभ्रूणहत्या आणि मानवता यासारख्या विषयांवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
उद्घाटक-आर. एम. चौगुले
मण्णूर गावातील यशस्वी अभियंता, उद्योजक आणि समाजसेवक असून आर. एम. चौगुले असोशिएट बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स व वननेस बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार दिला आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींग डिप्लोमा व बुंदेलखंडातून बी.टेक.पदवी प्राप्त केली आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे नेतृत्व सीमाभागासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
स्वागताध्यक्ष-दुद्दाप्पा बागेवाडी
स्वागताध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी येळ्ळूर गावचे सुपुत्र असून प्रसिद्ध बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर आहेत. गावच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात सहभाग असतो. त्यांनी येळ्ळूर ग्राम पंचायतीचे उपाध्यक्षपदही समर्थपणे सांभाळले आहे. सीमाचळवळीतील एक अग्रेसर कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून त्यांचा धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असतो.









