साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कडोली गाव सज्ज : चार सत्रात आयोजन
वार्ताहर/ कडोली
रविवार दि. 7 जानेवारी रोजी होणाऱ्या 39 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कडोली साहित्यिकांचा मेळा भरणार असून साहित्यिक मान्यवरांच्या स्वागतासाठी कडोली गाव सज्ज झाले आहे.
सालाबादप्रमाणे कडोली मराठी साहित्य संघ, सांगाती साहित्य अकादमी आणि अक्षरयात्रा दै. ‘तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही श्री दूरदुंडेश्वर विरक्त मठाच्या आंबा बागेतील झाडांच्या रम्य वातावरणात 39 वे कडोली मराठी साहित्य संमेलन भरत असून या संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रंथदिंडी आकर्षक आणि वैशिष्ट्यापूर्ण व्हावी यासाठी प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी तयारी केली आहे. ग्रंथदिंडी मार्गावर स्वच्छता राबविण्यात आली आहे. मराठी साहित्य संघाच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संमेलनस्थळी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.
गावच्या वेशीत अनुसया कल्लाप्पा मायाण्णाचे यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आल्यानंतर उद्घाटन समारंभ होईल. यावेळी उद्यमबाग येथील आनंद उद्योग समुहाचे उद्योजक अशोक गुंडू शिरोळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. कै. यल्लाप्पा लक्ष्मण होनगेकर संमेलन मंडपाचे उद्घाटन शांता यल्लाप्पा होनगेकर यांच्या हस्ते, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन सांगाती पतसंस्था हलकर्णी फाटा गजानन विठ्ठल सावंत यांच्या हस्ते, ग्रंथ दालनाचे उद्घाटन विराज फायनान्शियल सर्व्हिस अँड वेल्थ मॅनेजमेंट शाहूनगर वदान्य चैतन्य दास यांच्या हस्ते, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मे. आर. ए. काविलकर (व्यापारी) बेळगावचे गजानन शंकरराव काविलकर यांच्या हस्ते, सरस्वती प्रतिमा पूजन क्रियाकार आर्किटेक्ट फर्मच्या प्राजक्ता संभाजी होनगेकर यांच्या हस्ते, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन स्वरुपा इनामदार यांच्या हस्ते, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन डॉ. प्राजक्ता विश्वास टुमरी यांच्या हस्ते आणि महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा पूजन रवि भीमाण्णा होनगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
उद्घाटन समारंभानंतर वारणानगरचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. दिनेश पाटील यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित संदीप कदम (ठाणे) यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 2 ते 2.30 या वेळेत स्नेहभोजन होणार आहे.
तिसऱ्या सत्रात दुपारी 2.30 ते 3.15 या वेळेत नवोदितांचे कथाकथन होणार असून यावेळी समृद्धी पाटील (बालिका आदर्श विद्यालय बेळगाव), वैभवी मोरे (बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी) आणि कुशल गोरल (मराठी विद्यानिकेतन बेळगाव) यांच्या कथा सादर होणार आहेत.
चौथ्या सत्रात दु. 3.15 वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून कवी डॉ. स्वप्निल चौधरी (देहु, पुणे), कवी प्रशांत केंदळे (नाशिक) आणि कवयित्री गुंजन पाटील (छत्रपती संभाजीनगर) आदी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचा साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कडोली मराठी साहित्य संघाने केले आहे.
आजच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक अशोक गुंडू शिरोळे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावात एका शेतकरी कुटुंबात अशोक शिरोळे यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, मुचंडी येथे झाले.12 वीपर्यंतचे शिक्षण सरदार्स कॉलेज येथे पूर्ण झाले. नंतर त्यांनी उद्यमबाग येथे नोकरी करत स्वत:चा आनंद उद्योग हा व्यवसाय सुरू केला. आज अशोक शिरोळे यांचे उद्यमबाग औद्योगिक वसाहतीसोबतच शुगर इंडस्ट्रीमध्येही मोठे नाव आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्येसुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. गोरगरिबांना मदत त्यांच्याकडून होत असते. त्यांना आतूरतेने दानशूर आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते.









