अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत : पाच सत्रात रंगणार विविध कार्यक्रम
वार्ताहर/ येळ्ळूर
येथे रविवार दि. 5 रोजी येळ्ळूर मराठी साहित्य संमेलन परमेश्वरनगर येथे मोठ्या उत्साहात होणार आहे. साहित्य संमेलनात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची खास उपस्थिती राहणार आहे. संमेलनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्लीचे साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर भूषवणार आहेत.
संमेलन पाच सत्रात होणार असून सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी आहेत. पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण तर दुसऱ्या सत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे आपली संस्कृती आपला विकास यावर विचार मांडणार आहेत. तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कारांचे वितरण व एक तास बसा मनसोक्त हसा हा विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे सादर करणार आहेत. चौथे सत्र अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या प्रकट मुलाखतीचे असून पाचव्या सत्रात जागर लोककलेचा हे जुगलबंदी भारुड संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत.
या संमेलननगरीला दिवंगत अॅड. परशुराम नाईक यांचे नाव दिले असून दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांचे नाव प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. सभामंडपाला दिवंगत रामचंद्र गोरल यांचे नाव दिले असून दिवंगत बाबुराव गोरल यांचे नाव ग्रंथदालनाला देण्यात आले आहे. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कमिटीने केले आहे.
यावेळी ग्रंथदिंडी सकाळी 8.30 वाजता चांगळेश्वरी मंदिरापासून, उद्घाटन सकाळी 10 वाजता, अध्यक्षीय भाषण सकाळी 10.45 वाजता, प्रकट विचार दुपारी 1 वाजता, अल्पोपाहार 2.30 ते 3 वाजता, विनोदी कार्यक्रम दुपारी 3 ते 4 पर्यंत, अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत दुपारी 4 ते 5 पर्यंत, जुगलबंदी भारुड 5 ते 6.60 वाजेपर्यंत अशी पाच सत्रे रंगणार आहेत.









