त्रिपुरातील जाहीर सभांमध्ये पंतप्रधान मोदींचा आरोप, भाजपने विकास केल्याचे प्रतिपादन
अगरतळा / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचार सभांमध्ये काँगेस आणि डाव्यांवर धारदार शंरसंधान केले आहे. या दोन्ही पक्षांनी राज्याची लूट अनेक वर्षे केली. आता ते एकत्र येऊन पुन्हा सरकार स्थापना करण्याची स्वप्ने पहात आहेत. मात्र, त्यांच्या काळातील आर्थिक व्यवहार जनता विसरलेली नाही. भाजपने मात्र गेल्या पाच वर्षांच्या आपल्या सत्ताकाळात राज्यात मोठय़ा प्रमाणावर विकास केला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भाजपचे सरकार राज्यात येण्यापूर्वी तेथे डाव्या पक्षांच्या सरकारांनी सलग 4 दशकांपेक्षा अधिक काळ राज्य केले होते. त्यांच्या काळात लोकांच्या वाटय़ाला केवळ हालअपेष्टाच आल्या. लोकांना गरीब ठेवून त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी स्वतःची बरीच धन केली होती. पण भाजप सत्तेत आल्याने चित्र पालटलेले आहे. आता राज्यातील विकास ठळकपणे दिसून येऊ लागला असून त्याचे लाभही तळागाळातील लोकांना मिळू लागले आहेत. परिणामी, या राज्यातील जनता भाजपलाच पुन्हा मोठय़ा बहुमताने विजयी करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकासाच्या मार्गावर पुन्हा आणले
पंतप्रधान मोदी यांनी राज्यात शनिवारी दोन जाहीर सभा घेतल्या. भाजपच्या पाच वर्षांच्या काळात राज्य पुन्हा विकासाच्या मार्गावर परतले. विकास म्हणजे का असते याचीही कल्पना राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला गेल्या 50 वर्षांमध्ये नव्हती. तथापि, केंद्र सरकारच्या गरीब हिताच्या योजना आणि त्या क्रियान्वित करण्यात राज्य सरकारने केलेले महत्वपूर्ण योगदान यामुळे विकासाची गंगा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली आहे. लोकांमध्येही आता विकासाची मानसिकता निर्माण झाली आहे अशी मांडणी त्यांनी सभांमधून केली.
गृहनिर्माण कार्य वेगाने
गेल्या पाच वर्षांमध्ये भाजप सरकारने राज्यात मोठय़ा प्रमाणात गरीबांसाठी घरे बांधण्याचे कार्य केले. त्याचप्रमाणे अनेक आरोग्य सेवा प्रकल्प साकारले. रोजगार निर्मिती करुन लोकांच्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी हालचाली केल्या. विकासाचे हे नवे प्रारुप जनतेसाठी अनोखे होते. म्हणून लोकांनीही याकामी मोठय़ा प्रमाणात सहकार्य केले. या निवडणुकीनंतरही हेच चित्र असेल, अशी मांडणी त्यांनी केली.
विकासाचे ‘हीरा’ (एचआयआरए) सूत्र
या राज्यात पायाभूत विकासाचे ध्येय साकारताना हायवेज किंवा एच (महामार्ग निर्मिती), इंटरनेट किंवा आय, रेल्वे किंवा आर आणि एअरवेज किंवा ए (विमानसेवा) या चार बाबींवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे हे ‘हीरा’ सूत्र त्रिपुराला चांगलेच लाभदायक ठरले असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. राज्यातील ‘डबल इंजिन’ सरकार या निवडणुकीनंतरही आणा असे आवाहन त्यांनी केले.
विकासकार्यावरच प्रचारात भर
ड पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा दिला विकासावर भर
ड राज्यात पाच वर्षांमध्ये आजवर झाला नव्हता तेव्हढा विकास ः प्रतिपादन









