विश्वाच्या गुंफलेपणाची जपणूक
साऱया सृष्टीतला आनंद भरभरून ओतणारा श्रावण सणावाराच्या निमित्ताने भोजनापुरता मर्यादित न राहता सगळय़ा पंचमहाभूतांना भेटवत असतो. शंकराच्या दर्शनासाठी डोंगर कपारी शोधत आमच्यातला गिर्यारोहक भक्त, निमित्त करून भटकंतीला निघतोच. याच सुखासाठी शिवथर घळ समर्थभक्तांना साद घालते आणि शिष्याला जणू माहेराचं सुख लाभतं.
खरं तर डोंगर सतत मौनात बसलेल्या योग्यासारखे भासतात. याच्या सान्निध्यात चांगले-वाईट, भले-बुरे कोणीही येऊ दे, हा आपला स्थितप्रज्ञ, धीरगंभीर. याच्या अंगा-खांद्यावरून ओघळणारे, खळाळणारे झरे यज्ञोपवितासारखे भासतात. आता या योग्याच्या पुढय़ात दरीतून पांढरे शुभ्र ढग यज्ञाच्या धुरासारखे वरवर येत राहतात. फुलांच्या राशी योग्याच्या पायावर सतत टाकणारी झाडं, वेली कृतार्थ जीवन जगत असतात.
श्रावणात वातावरण काळवंडून जातं आणि सहस्त्र धारांनी या योग्याला अभिषेक सुरू होतो. हजारो मोत्यांची ताटं आकाशातून उधळावीत तसं वाटतं. इंद्रधनुची रांगोळी पटकन कोणीतरी रेखून जातं, सारं कसं विलक्षण भारावलेलं.
तास-दोन तासांनी हा अभिषेक थांबल्यावर साऱया सृष्टीला जाग येते. पशुपक्षी अंग झाडून भटकायला निघतात. वळचणीला पाणी गेलं की सरपटणारे सगळेच आश्रय शोधत हिंडत राहतात. श्रावण म्हणजे निसर्गाचं माहेरपणच. आमच्या जिवतीच्या प्रत्येक कथा-कहाणीत प्राण्यांना, जनावरांना आदराचं स्थान. ते आहेत म्हणून आपण आहोत. निसर्गाशी नाळ जोडून आहोत. ‘भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे’ याची ही प्रत्यक्ष अनुभूती. विश्वाचं गुंफलेपण जपणारा महिना म्हणून श्रावणाचं वेगळेपण आहेच.
नागपंचमी म्हटलं की तक्षकाची गोष्ट आठवते, तसाच माहेरी पाठराखण करणारा नागही आठवतो, शेतकऱयाचं धान्य फस्त करणाऱया उंदराचा समाचार घेणारा नाग या निमित्ताने पूजला जातो. त्याच्या संवर्धनाची काळजी अनेक सर्पमित्र, प्राणीमित्र आणि पक्षीमित्रांकडून घेतली जाते.
एका देशात तांदळाचे पीक घेणारे शेतकरी नेहमीप्रमाणेच शेत नांगरून लागवडीसाठी सज्ज झाले. काळजी होती फक्त चिमण्यांच्या धाडीची. धान्याचं उत्पन्न कमी झालं तर वर्ष खराब जाणार. म्हणून उपाय शोधायला सुरुवात झाली. चिमण्यांना पळवून लावणे एवढाच कार्यक्रम सुरू झाला. जुन्या-जाणत्यांनी ‘असे करू नका’ म्हणून बजावले. पण तरुण रक्त ऐकेल तर ना? मुलांनी सरकारची मदत घेऊन छऱयाच्या बंदुका मिळविल्या आणि प्रश्न कायमचाच सोडवला. आता पीक जोमाने वाढू लागले. कापणी, मळणी सुरू झाली. पण हवं तसं धान्य मिळालं नाही. सगळेच काळजीत पडले. जुन्या लोकांना विचारलं, तेव्हा आश्चर्य वाटेल असं कारण पुढं आलं. त्या तांदळाच्या पिकावर वाढणारे किडे खायला चिमण्या यायच्या. त्या नसल्याने किडीमुळे उत्पन्न घटले आणि जीव मात्र चिमण्यांना गमवावा लागला.
निसर्गातली अन्नसाखळी तुटायची नसेल तर प्रत्येकाला आपापला हिस्सा मिळायलाच हवा. माणूस मात्र स्वार्थासाठी प्राण्यांना नामशेष करायला निघालाय. प्राण्यांमध्येही हल्ली विचित्र सवयी वाढीला लागल्यात. भूतदयेच्या नावाखाली कुत्र्यांना बिस्कीट देणारे, कबुतरांना दाणे घालणारे त्यांच्यातल्या झगडून मिळविण्याच्या नैसर्गिक वृत्तीला मारक ठरतायत. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या. त्यांचे सण त्यांच्या वंशवृद्धीसाठी असू द्या. नागपंचमी, पोळा, गोवर्धन महोत्सव, आवळी भोजन निसर्गाला जपण्यासाठी असू द्या. जुन्याला नवीन जोड देताना निसर्गात ढवळाढवळ नकोच. निसर्गाच्या नादाबरोबर आपला अंतर्नाद ऐकू यायला श्रावण आलाय. डॉक्टर फडणवीस लिहितात,
भ्रमराची भ्रामरी असो
असो प्राण्यांचा हुंकार
सागराची खळखळ असो
असो धनुष्याचा टणत्कार
पक्ष्यांची किलबिल असो
आणि पानांची सळसळ
या सृष्टीत भरून असतो
नाद तो अविरत पळ।
सौ. अद्वैता उमराणीकर









