पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती : आर्थिक मदतीसाठी उद्या दिल्लीत आंदोलन
बेळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी हायकमांडकडे पाठविण्यात आली आहे. यावर हायकमांडच अंतिम निर्णय घेणार आहे. तर केंद्र सरकार आर्थिक मदत करण्यात दुजाभाव दाखवत आहे. यासाठी दि. 7 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, काँग्रेसचे आमदार सहभागी होणार असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये काँग्रेस पक्षाकडून मेळावे भरविण्यात येत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, काँग्रेस पक्षाकडून राज्यामध्ये गॅरंटी योजना जारी करण्यात आल्या आहेत. याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी असे मेळावे भरविण्यात येत आहेत. जिल्ह्यासह तालुका पातळीवरही मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण सवदी भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, भाजपकडून हवेमध्ये गोळी मारली जात आहे. आपल्या पक्षामध्ये निष्ठावंतांना चांगली संधी आहे. त्यांनी संयम राखला पाहिजे. त्यांनाही भविष्यात चांगली संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून पक्षपातपणा केला जात आहे. यासाठी दि. 7 रोजी दिल्ली येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, राज्यातील मंत्री व आमदार सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.









